भारताच्या सीमेवर बलाढ्य चीनकडूनही सीमेवर कुरापती वाढल्या आहेत. त्यामुळे भारतीय लष्कराला या सर्वांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सुसज्ज होणं ही काळाची गरज झाली आहे. राफेल या लढाऊ विमानांची पहिली खेप भारतात दाखल झाल्यानंतर आता दूसऱ्या फेरीत आणखी 10 राफेल विमानं भारतात दाखल होणार आहेत. एप्रिल महिन्यात ही विमानं भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात समाविष्ट होतील. त्यामुळे राफेल लढाऊ विमानांची एकूण संख्या 21 वर पोहोचणार आहे. भारताने फ्रान्ससोबत सप्टेंबर 2016 साली एकूण 36 राफेल लढाऊ विमानांचा करार केला होता. आता 10 राफेल विमानांची खेप येणार असल्याने ही संख्या 21 वर पोहोचणार आहे. यापूर्वी भारतात 11 राफेल लढाऊ विमानं आली असून अंबाला स्क्वॉड्रनमध्ये सहभागी झाली आहेत.
जुलै-ऑगस्ट महिन्यापासूनच भारतीय वायुसेनेनं राफेल लढाऊ विमानांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. आता येणाऱ्या विमानांपैकी काही बंगालच्या हाशिमारा बेसवर तैनात केली जाणार आहे. हाशिमारा एअर फोर्स स्टेशन भूटानजवळ असून तिबेटपासून 384 किलोमीटर दूर आहे. मल्टिरोल लढाऊ राफेल विमानात प्रत्येक मोहीमेत काम करण्याची क्षमता आहे. हे विमान एका मिनिटात 60 हजार फूट उंचीवर झेप घेऊ शकते. राफेलची मारक क्षमता 3700 किलोमीटरपर्यंत आहे. स्काल्पची रेंज 300 किलोमीटरपर्यंत आहे. राफेलचा वेग 2,223 किलोमीटर प्रति तास इतका आहे.
Comments
Loading…