लोकशाही न्यूज नेटवर्क
भाजपाला जळगाव जिल्ह्यात मोठं खिंडार पडलं आहे. एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता खडसे समर्थक ३१ आजी-माजी भाजपा नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसे यांनी अनेक भाजपातील लोक राष्ट्रवादीत येणार असल्याचे संकेत दिले होते.
जळगावच्या भुसावळमधील ३१ आजी-माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे. यात १८ विद्यमान आणि १३ माजी नगरसेवकांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे यांनी प्रवेश केल्यानंतर जळगावसह उत्तर महाराष्ट्रात भाजपाला धक्का बसणार असल्याचं मत अनेक राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलं होतं. खुद्द खडसे यांनीही भाजपातील अनेक जण राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं होतं. भाजपानं माझा जितका छळ केला तो त्यांना महागात पडेल, असं खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं. एकाचवेळी तब्बल ३१ नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशानं खडसेंनी आपलं राजकीय ‘वजन’ दाखवून दिल्याच्या चर्चा होत आहेत.
Comments
Loading…