राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पाश्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आला आहे. अशातच राज्याचे मुख्यालय समजल्या जाणाऱ्या मंत्रालयात महसूल विभागातील 8 कर्मचारी कोरोना बाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. तसंच महसूल विभागातच आणखी आठ ते नऊ लोकांना ताप, थंडी, खोकला अशी कोरोनाची लक्षणे आढळल्याची देखील माहिती समोर येत आहे.
प्रशासकीय आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मंत्रालयातच कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने एकच खळबळ माजली असून पुढील काही दिवसात मंत्रालयात पुन्हा एकदा सर्वसाधारण प्रवेशाला देखील मर्यादा आणण्याचा विचार सुरू आहे.
नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधून ‘मी जबाबदार’ ही मोहीम सुरू केली आहे. धार्मिक सामाजिक-राजकीय कार्यक्रम, जत्रा-यात्रा रद्द कराव्यात अशा स्वरूपाचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. त्याच प्रमाणे पुढील 8 दिवसांचा आढावा घेऊन लॉकडाऊन बद्दल निर्णय घेतला जाईल
मागील ३ दिवसात ‘या’ मंत्र्यांना झाला आहे करोना
राज्यातील गेल्या तीन दिवसांमध्ये चार कॅबिनेट मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आलं आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतेक मंत्री आहेत. जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील. अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री बच्चू कडू या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व मंत्री विलगीकरणामध्ये असून या सर्व मंत्र्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन देखील केले आहे.
Comments
Loading…