in ,

अण्णांनी आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी – शिवसेना

लोकशाही न्यूज नेटवर्क

प्रजासत्ताक दिनापासून दिल्लीतील परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी धुमश्चक्री झाल्या. त्याचबरोबर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनापासून उपोषण करणार होते. मात्र, केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांशी चर्चा केल्यानंतर शुक्रवारी त्यांनी उपोषण मागे घेण्याचे ठरवले. केंद्र सरकार उच्चाधिकार समिती स्थापन करणार, या प्रस्तावावर अण्णा समाधानी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून आता शिवसेनेने अण्णांनी आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन सामनाच्या अग्रलेखातून केले आहे.

केंद्रीय कृषी राज्यमंत्री चौधरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्तीनंतर अण्णा हजारे यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली. या निर्णयाचा हवाला देत शिवसेनेनं सामना अग्रलेखातून शंका उपस्थित करणारे काही प्रश्न विचारले आहेत.

“शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अण्णा हजारे यांनी निर्णायक उपोषणाची घोषणा केली होती व अण्णांनी उपोषण करू नये म्हणून महाराष्ट्रातील भाजपा पुढारी राळेगणसिद्धीत जाऊन अण्णांशी चर्चा करीत होते. हे चित्र तसे गमतीचेच होते आणि घडलेही अपेक्षेप्रमाणेच. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर अण्णांनी उपोषण स्थगित केले.

‘केंद्र सरकारला आपण शेतकऱ्यांशी संबंधित १५ मुद्दे दिले आहेत. त्यावर केंद्र सरकार नेमणार असलेल्या उच्चस्तरीय समितीमध्ये योग्य ते निर्णय होतील, असा आपल्याला विश्वास वाटतो म्हणून आपण आपले उपोषण स्थगित करीत आहोत,’ असे अण्णांनी सांगितले. अण्णांनी उपोषणाचे अस्त्र बाहेर काढायचे आणि नंतर ते म्यान करायचे असे यापूर्वीही घडले आहे. त्यामुळे आताही ते घडले तर त्यात अनपेक्षित असे काही नाही,” अशी शंका शिवसेनेनं बोलून दाखवली आहे.

“सरकार आता त्यांचे आंदोलन चिरडायला निघाले आहे. गाझीपूर बॉर्डरवर सरकारने शेतकऱ्यांची कोंडी केली आहे. वीज, पाणी, अन्नधान्याची रसद कापली आहे. शेतकरी हे जणू आंतरराष्ट्रीय भगोडे आहेत, अमली पदार्थांचे आर्थिक गुन्हेगार आहेत असे ठरवून त्यांना ‘लुकआऊट’ नोटीस बजाविण्यात आली आहे. हे धक्कादायक आहे. अण्णा हजारे यांचे या घडामोडींवर नेमके काय मत आहे? मुळात अण्णा हजारे जे उपोषण करू इच्छित होते, त्यामागचा नेमका हेतू काय आहे? कृषी कायदे रद्द करावेत असे आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अण्णा हजारे यांचे उपोषण शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी होते काय हे स्पष्ट झालेले नाही. अण्णांचे उपोषण त्यासाठी असते तर अण्णांना मोदी सरकारविरोधात उघड भूमिका घ्यावी लागली असती. राळेगणमध्ये जे भाजपाचे पुढारी मनधरणी वगैरे करण्यासाठी आले त्यांना तसे स्पष्ट शब्दांत सांगावे लागले असते.

मनमोहन सिंग पंतप्रधान असताना अण्णा दोन वेळा दिल्लीत आले व त्यांनी जंगी आंदोलन केले. या आंदोलनाच्या मशालींवर तेल ओतण्याचे काम तेव्हा भाजपा करीत होता, पण गेल्या सात वर्षांत मोदी राज्यात नोटाबंदीपासून लॉक डाऊनपर्यंत अनेक निर्णयांमुळे जनता बेजार झाली, पण अण्णांनी कूसही बदलली नाही असा आरोप होत राहिला. म्हणजे आंदोलने फक्त काँग्रेस राजवटीतच करायची काय? बाकी आता रामराज्य अवतरले आहे काय? अण्णा आज एकाकी पडले आहेत. राजकीय पक्षांनी त्यांना वेळोवेळी वापरून घेतले. त्यात अण्णांच्या शरीराची प्रचंड झीज झाली. उपोषण करणे व ती पुढे रेटणे ही साधी गोष्ट नाही. पुन्हा अण्णांचे वय पाहता त्यांनी जिवाचा धोका पत्करू नये. मागच्या उपोषणाचे परिणाम अण्णांच्या शरीराच्या अनेक अंगांना भोगावे लागत आहेत. पण अण्णांनी एखादे आंदोलन छेडणे यास आजही महत्त्व आहेच,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शक्ती कायदा | 36 जिल्ह्यांत स्वतंत्र कोर्टांसह पथकांचीही नेमणूक करणार – गृहमंत्री अनिल देशमुख

संतप्त पालकांचा शिक्षणमंत्र्यांचे घर, सेना भवनवर आज माेर्चा