आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवरायांच्या राजनितीचा दाखला देत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलनावरून भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या देठाला धक्का लागू नये असा न्याय असावा हे शिवाजी महाराजांनी सैन्याला सांगितले होते. मात्र, आज शेतकऱ्यांच्या पोटाला, देठाला, अस्तित्वाला धक्का लागतोय, ही परिस्थिती बिकट आहे, असे राऊत म्हणाले.
शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव हा देशात साजरा होत आहे. शिवाजी महाराजांकडून संपूर्ण देश खरी प्रेरणा घेतोय. आपण त्यांना हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणतो. निश्चयाचा महामेरू म्हणतो, महाराष्ट्राला इतिहास आहे, इतरांना केवळ भूगोल असेल, मात्र शिवरायांचा जन्म या मातीत झाला ही बाब महत्वाची आहे. तसेच ज्या शिवाजींच्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब, असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले.
विरोधकांवर निशाणा साधताना इतिहासाचा दाखला देत राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनाही विरोधक होते. अफजल खान, शाहिस्ते खान होता. पण तरीही शिवाजी महाराज खचले नाहीत. सगळ्यांचा कोथळा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवले. त्याच प्रमाणे महाराष्ट्रातही होईल, असा टोला लगावला.
Comments
Loading…