भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईस रुग्णालयाला गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत आतापर्यत 10 जणांचा मृत्यू झाला असून 60 जणांना वाचवण्यात यश आले. अद्यापही घटनास्थळी आग धुमसते आहे. या प्रकरणी आता घटनेत हलगर्जीपणा झाल्याचे समोर आल्यास दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भांडूपच्या ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या घटनास्थळी भेट दिली.यावेळी त्यांनी मृतांच्या कुटुंबियांची दिलगिरी व्यक्त केली. तसेच अग्निशामन दलाने असंख्य जणांचा या घटनेत बचाव केल्याने त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचं ठाकरे म्हणाले.
दरम्यान या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. या रुग्णालयाला तात्पुरती परवानगी देण्यात आली होती. तसेच 31 मार्चला परवानगीची मुदत संपत असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेत हलगर्जीपणा झाला असल्याचे समोर आल्यास सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
“एकूण ७८ लोक रुग्णालयात दाखल होते. यामधील १० जणांचा मृत्यू झाला असून इतर ६८ जण इतर रुग्णालयात दाखल झाले आहेत तर काहीजण घरी गेले आहेत. ती यादी आमच्याकडे आहे. गुरुवारी येथे ८४ लोक आले होते, ज्यामध्ये ५० पुरुष आणि ३४ महिला होत्या. पाच ते सहा जणांबद्दलची माहिती आम्ही अद्याप मिळवत आहोत,” अशी माहिती यावेळी पोलिसांनी दिली.
Comments
Loading…