काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नसल्याचा इशारा दिला होता. त्यांच्या या विधानानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली असून नाना पटोले प्रसिद्धीसाठी असे विधान करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पब्लिसिटी स्टंट
नाना पटोलेंचं अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या संदर्भातली विधान म्हणजे केवळ प्रसिद्धीसाठी आहे. एखाद्या मोठ्या अभिनेत्याबद्दल बोललं की दिवसभर प्रसिद्धी मिळते. म्हणजे बदनाम हुआ तो क्या हुआ नाम तो हुआ, असा टोला फडणवीस यांनी पटोलेंना लगावला.
कॉंग्रेसची धमकी
देशाच्या हितासाठी ट्वीट करणे अपराध आहे का ? कॉंग्रेस नेत्यांना झालंय तरी काय? असा सवाल नाना पटोले यांच्या विधानावर भाजप नेते राम कदम यांनी विचारले आहेत. तसेच कॉंग्रेसने एक गोष्ट लक्षात ठेवावी देशासोबत उभे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी देश उभा राहणार असल्याचा सूचक सल्ला दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसची उडी
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना फटकारल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. देशातील प्रश्नावर बोलण्याचा अक्षय कुमारला बोलण्याचा अधिकार नाही. तो कॅनडाचा नागरिक आहे. तर अमिताभ बच्चन काही देशाचा आदर्श नाहीत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या दोन्ही अभिनेत्यावंर टीकास्त्र डागलंय.
पटोले नेमकं काय म्हणाले?
मनमोहन सरकारच्या काळात सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र आता त्यांनाही विसर पडल्याने भविष्यात काँग्रेस अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे चित्रिकरण महाराष्ट्रात होऊ देणार नाही तसेच त्यांचे सिनेमे प्रदर्शितही होऊ देणार नाही, असा सक्त इशारा नाना पटोले यांनी दिला.
Comments
Loading…