अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरण मुंबई पोलिसांकडून काढून सीबीआयकडे सोपविण्यात आले. मात्र त्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले. या प्रकरणाचा अहवाल अद्याप का आला नाही, असा सवाल काँग्रेसने केला आहे.
राजीव गांधी भवन या मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात आज (मंगळवार) नाना पटोले यांनी ज्येष्ठ नेत्यांसोबत बैठक घेऊन मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस योग्य प्रकारे करीत होते. त्यावरून तीन महिने भाजपाने नुसती राळ उडवली. अचानक या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. त्याचा तपास अहवाल अद्याप आलेला नाही. यामध्ये भाजपाच्या काही जणांचा सहभाग होता, अशी आमची माहिती असल्याचे पटोले म्हणाले.
कोरेगाव भीमा प्रकरणातही असेच झाले. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत होते. पण तोही अचानक राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्यात आला. हा तपास देखील कुठपर्यंत आला आहे, याची कोणालाही माहिती नाही, अशी टीका त्यांनी केली.
Comments
Loading…