in

‘खुशी से कौन अपने मुल्क से बाहर रहा है’; कर्नाटकातील मराठीजनांची भावना असेल का?

श्रीकांत घुले

काही प्रश्न अनुत्तरित ठेवणं किंवा एखादा विषय भिजत ठेवणं ही राजकीय ‘व्यवस्था’ असते. काही विषयांवर तोडगा न काढण्यात बऱ्याचदा राजकीय ‘भविष्य’ दडलेलं असतं. असाच अनेक दिवसांपासून राजकीय, सामाजिक आणि न्यायिक प्रक्रियेत अडकलेला संवदेनशील मुद्दा म्हणजे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद. आजपर्यंत अनेकदा या विषयावर लिहून, बोलून झालं आहे मात्र अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. बेळगावात अनेक दिवसांपासून मराठी भाषिकांवर अन्याय होत आहे. आता पुन्हा एकदा बेळगावात मराठी दुकानांच्या पाट्यांना काळं फासण्यात आलं. अनेक ठिकाणी बसेसवर दगडफेक झाली. खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर बेळगाव बस बंद करण्यात आल्या आहेत.

समुद्राच्या किनाऱ्यावर जशा काही ठराविक अंतरानं लाटा येतात अगदी त्याचप्रमाणे सीमावादाचा हा मुद्दा ठराविक कालावधीनंतर पुन्हा चर्चेत येत राहतो. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेळगावप्रकरणी एक वक्तव्य केलं होतं. यानंतर कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. वादग्रस्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच, असे वक्तव्य मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आणि नव्या चर्चेला सुरुवात झाली. यानंतर कर्नाटक सरकारमधील लोकांकडूनही अनेक प्रत्युत्तरे देण्यात आली. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी तर, ‘बेळगाव घ्या आणि मुंबई द्या’ असे वक्तव्य करून नवीनच वाद निर्माण केला.
महाराष्ट्र आणि कर्नाटकादरम्यान आजही सीमेवरील परिसरात १२ पंचायत क्षेत्र आणि ८६५ गावांना घेऊन कायदेशीर लढाई सुरू आहे. उत्तर कर्नाटकात आजही मराठी विरुद्ध कन्नड याच मुद्यावर निवडणूक लढवली जाते, हे वास्तव आहे.

१९५६ साली देशात भाषावार प्रांतरचना करण्यात आली. यानुसारच राज्यांचं गठन करण्यात आलं. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर ‘बेळगाव’ हे बॉम्बे स्टेटचा भाग बनलं. मात्र, १९५६ साली जेव्हा भाषावार राज्यं करण्यात आली तेव्हा अनेक आंदोलने होत होती. महाराष्ट्र राज्याची निर्मिती होत होती, तेव्हा संयुक्त महाराष्ट्रात बेळगावलाही समाविष्ट करण्याची मागणी जोर धरू लागली. त्यावेळी मुंबईवर गुजरातसुद्धा हक्क दाखवत होतं आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू या भागाला केंद्रशासित प्रदेश ठेवण्याचा विचार करत होते. यावेळी एस.एम.जोशी, आचार्य अत्रे आणि प्रबोधनकार ठाकरेंसारखी वेगवेगळ्या विचारधारांची लोक एकत्र येऊन संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन चालवत होते. अखेर मुंबईला नवनिर्मित महाराष्ट्राची राजधानी बनवण्यात आलं. मात्र, बेळगावसह निपाणी, भालकी, बिदर, कारवार, धारवाड आणि हुबळी यासारखे मराठी भाषा बहुल भाग म्हैसूर स्टेट (१९७३ साली कर्नाटक) मध्ये राहिले. तेव्हापासूनच बेळगावसहित ८६५ गावं महाराष्ट्रात समाविष्ट होण्याची लढाई लढत आहेत.
आंदोलन सुरू ठेवण्यासाठी ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’ची स्थापना झाली. यानंतर केंद्र सरकारनं महाराष्ट्राच्या मागणीचा विचार करता 1957 साली महाजन समिती गठीत केली. १९६६ साली केंद्र सरकारनं पुन्हा महाजन आयोगाची स्थापना केली. या आयोगानं बेळगावला कर्नाटकातच ठेवलं आणि कर्नाटकातील २६४ गावं महाराष्टाला दिली. मात्र, महाराष्ट्र सराकारनं हा प्रस्ताव नाकारला. यानंतर दशकांपासून हा वाद महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये अद्यापही सुरूच आहे. या भागात राहणारे मराठी भाषिक कर्नाटक सरकारकडून अन्याय होत असल्याची तक्रार करतात.

कर्नाटकातील मराठीबहुल भाग महाराष्ट्रात आणण्यासाठी अनेक आंदोलनं झाली. यात हिंसाचारही झाला. महाराष्ट्र एकीकरण समिती’ आणि ‘कन्नड रक्षण वेदिके’सारख्या संघटनांमधील वाद हिंसेपर्यंत पोहोचलेला आहे. २००६ साली महाराष्ट्र सरकार कर्नाटकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. यानंतर कर्नाटकने बेळगावला २००६ साली उपराजधानीचा दर्जा दिला होता. याच काळात कर्नाटक सरकारनं बेळगावचं नाव बदलून ‘बेलगावी’ असं केलं. या मुद्यावरूनही जोरदार आंदोलनं झाली. आजही बेळगाव आणि सीमाभागाचा मुद्दा घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारमध्ये सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई सुरूच आहे.

१९५६ नंतर अनेक वर्ष उत्तर कर्नाटकातील या भागातून ७ मराठी आमदार निवडले जात होते. आजही येथील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मराठी लोकप्रतिनिधींची संख्या जास्त आहे. केवळ महाराष्ट्र एकीकरण समितीच नव्हे तर भाजपा आणि काँग्रेससारखे राष्ट्रीय पक्षसुद्धा मराठी उमेदवार उभे करतात.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला राम मंदिराचा मुद्दा असो की, ३७० सारखं जटील कलम हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं तत्परता दाखवून यावर तोडगा काढला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. याप्रकरणी केंद्र सरकारनं योग्य ती पावलं उचलावी आणि अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठीजनांना न्याय मिळवून द्यावा, हीच या भागातील जनतेची अपेक्षा आहे.

कर्नाटकातील समस्त मराठीजनांची भावना पाहता मला पाकिस्तानी शायर तहजीब हाफी याचा एक शेर आठवतोय.
बहुत मजबूर होकर मैं तेरी आँखों से निकला,
खुशी से कौन अपने मुल्क से बाहर रहा है !

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला केवळ राजकारणाची काळजी, मराठा समाजाची नाही; भाजपाची टीका

‘या’ अभिनेत्रीच्या बिकिनीतील फोटोंनी इंटरनेटवर लावली आग, मालदीव किनाऱ्यावरचे फोटो शेयर करत म्हणाली मी पण…