पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) पुणेकरांसाठी एक योजना तयार केली आहे. अवघ्या 10 रुपयांमध्ये पुणेकरांना शहरातील मध्यवर्ती भागात एसी बसमधून दिवसभर फिरता येईल. पण या बसची निविदा प्रक्रिया आत्ता सुरू करण्यात आली असल्याने या बस पीएमपीएमएलकडे बस आल्यानंतरच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
दिवसेंदिवस आर्थिक गर्तेत सापडलेल्या मुंबईच्या ‘बेस्ट’ला महापालिकेने आर्थिक मदत दिली. त्याशिवाय बेस्ट बसचे किमान भाडे पाच रुपये केले. त्यामुळे मुंबईकरांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि बेस्टच्या उत्पन्नात काही प्रमाणात वाढ झाली. तसाच काहीसा प्रयोग पुण्यात केला जाणार आहे. शहरातील खासगी वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. म्हणूनच रस्त्यावरील खासगी गाड्यांची संख्या कमी करून अल्पदरात सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दहा रुपयामध्ये दिवसभर प्रवास करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. स्थायी समितीने यासंबंधीच्या ठरावाला मंजुरी दिली, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
या प्रकल्पासाठी 50 बसेसची खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी 13 कोटी 47 लाख रुपये खर्च करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. याची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून त्यानंतर बस खरेदी होईल. त्यामुळे या उपक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी दीड महिन्यांनी होईल, असेही रासने म्हणाले.
Comments
Loading…