बर्फाच्छादीत लडाख सीमेवर तैनात जवानांसाठी थंडीपासून बचाव करणाऱ्या पर्यावरणपूरक तंबूचे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या लडाखमधील शिक्षणतज्ञ व शास्त्रज्ञ सोनम वाँगचुक यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. वाँगचुक यांच्या प्रयोगाची प्रशंसा करताना मुख्यमंत्री म्हणाले, ही आहे देशभक्ती, हे आहे देशप्रेम. तुमच्या जिद्द आणि समर्पणाला सोनमजी सलाम!’
मुख्यमंत्री अभिनंदन संदेशात म्हणतात, देशाच्या रक्षणासाठी अविचल, निष्ठेने सज्ज जवानांसाठी आपल्या ज्ञानाचा आणि प्रतिभेचा उपयोग व्हावा, यासाठी धडपडणे यालाच देशभक्ती, देशप्रेम म्हणतात. बर्फाच्छादीत प्रदेश, कडाक्याची थंडी अशा संकटाला तोंड देणाऱ्या या जवानांचा आणि पर्यावरणीय समतोल यांचा विचार करून तुम्ही संशोधित केलेल्या सुविधा निश्चितच महत्त्वपूर्ण ठरतील. देशाप्रती तुमची ही बांधिलकी तरूण पिढीसाठी प्रेरणादायी आणि देशाभिमान जागृत करणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
सोनम वांगचुक यांनी सौरऊर्जेवर आधारित तंबू तयार केले आहेत जे एकावेळी भारतीय लष्कराच्या 10 जवानांना वापरता येतील आणि ते पूर्णपणे पोर्टेबल आहेत. तंबूत हिटरचा वापर करण्यात आला आहे, हा हिटर सौरऊर्जेने संचालित होतो. तंबूचे वजन 30 किलोपेक्षाही कमी आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून या सौर तंबूचे फोटो शेअर केले आहेत.
Comments
Loading…