भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिवंगत एपीजे अब्दुल कलाम हे राष्ट्रपती होण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. त्यावरून काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने टीका केली आहे. मोदींमुळे विश्वाची उत्पत्ती झाली असेही चंद्रकांत पाटील बोलू शकतील, अशी उपरोधिक टीका काँग्रेसने केली.
पंतप्रधान मोदी यांनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले. मुस्लीम होते म्हणून त्यांना बाजूला ठेवले नाही. एक संशोधक म्हणून त्यांना मान दिला, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यावरून काँग्रेसने जोरदार टीका केली. ‘एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले, तेव्हा मोदींमुळे ते झाले हे सांगितले नाही. आता अटलजी व एपीजे अब्दुल कलाम हेही नाहीत. चायवाला म्हणून व पदवी घेताना कोणी पाहिले नाही. मोदींच्या बाललीलांचे पुरावे द्यायचे नसल्याने भविष्यात मोदींमुळे विश्वाची उत्पत्ती झाली, असेही चंद्रकांत पाटील बोलू शकतील,’ असे ट्विट काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.
संजय राऊत म्हणतात…
डॉ. अब्दुल कलाम यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार करणे हा अटलबिहारी वाजपेयी यांचा मास्टरस्ट्रोक होता. त्यात प्रमोद महाजन यांचाही वाटा होता. डॉ. अब्दुल कलाम सर्वमान्य उमेदवार व्हावेत, यासाठी सगळ्यांचे प्रयत्न होते. माझ्या ज्ञानानुसार त्यावेळी मोदी राष्ट्रीय राजकारणात नव्हते. कदाचित आमचे ज्ञान कमी असेल, अशी कोपरखळी संजय राऊत यांनी मारली.
…तेव्हा अटलजी मोदींना राजधर्म शिकवत होते
अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले; तेव्हा अटलबिहारी वाजपेयी सत्तेत होते. कलाम यांना राष्ट्रपती करण्याचा निर्णय एकमताने झाला होता. त्यामध्ये नरेंद्र मोदींचा सहभाग नव्हता, उलट त्या काळात अटलजी मोदींना राजधर्म काय?, याचा धडा शिकवत होते, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली.
Comments
Loading…