कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे वर्षभरापूर्वी सर्वकाही ठप्प झाले होते. नव्या वर्षाच्या सुरुवातीला कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला होता. पण आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने धोक्याची घंटा वाजू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरात कोरोनाचे अनेक हॉटस्पॉट तयार होत आहेत.
मुंबईत 2 फेब्रुवारीला कोरोनाचे नवे 334 रुग्ण सापडले होते. पण 15 दिवसांतच ही संख्या दुपटीने वाढली. आता हा आकडा 751वर पोहोचला आहे. त्यातही मुंबईच्या उपनगर भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. बोरीवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळकनगर या भागातील रुग्णसंख्या लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने 61 झोपडपट्ट्या आणि चाळी या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. तर 545 इमारती सील केल्या आहेत. याशिवाय, कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही सोसायट्यांना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत.
मुंबईत मुलुंडमधील 171, घाटकोपर 185, कुर्ला 36, चेंबूर 35, सांताक्रूझमध्ये 47 इमारती सील आहेत. तर भांडुप पवई विक्रोळीत 10, घाटकोपर 10, कुर्ला 8, खार 6, चेंबूर 5, तर मुलुंडमध्ये 4 झोपडपट्ट्या आणि चाळी महापालिकेने कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित केल्या आहेत
Comments
Loading…