in

अंबरनाथमध्ये रेमडेसिविर अभावी रुग्णांची बिकट अवस्था

A health official draws a dose of the AstraZeneca's COVID-19 vaccine manufactured by the Serum Institute of India, at Infectious Diseases Hospital in Colombo, Sri Lanka January 29, 2021. REUTERS/Dinuka Liyanawatte/File Photo

प्रतिनिधी मयुरेश जाधव

अंबरनाथ शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून पालिकेच्या कोव्हीड केअर सेंटरनं गंभीर रुग्णांना दाखल करून घेणंच बंद केले आहे . तर खासगी रुग्णालयात इंजेक्शनसह ऑक्सिजनचाही तुटवडा निर्माण झाला असून त्यामुळे आता रुग्णांचे हाल बिकट होत आहेत. सध्या अंबरनाथ शहरात पालिकेने डेंटल कॉलेजमध्ये कोव्हीड केअर सेंटर उभारलं असून तिथल्या ५७० पैकी ४०० बेड्सला ऑक्सिजन सुविधा आहे. तर आयसीयूमध्ये १६ बेड्स असून त्यातील ७ बेड्सला व्हेंटिलेटर्स आहेत.ऑक्सिजन सुविधा असलेले सर्वच्या सर्व बेड सध्या फुल आहेत. तसंच सातही व्हेंटिलेटर्स रुग्णांना लावलेले आहेत. ज्या रुग्णांचा सिटीस्कॅनचा स्कोअर २५ पैकी १५ पेक्षा जास्त असतो, म्हणजेच ज्यांच्या फुफ्फुसात ६० टक्क्यांपेक्षा जास्त संसर्ग असतो, अशा रुग्णांना ऑक्सिजन, स्टेरॉइड्स यासोबतच तातडीने रेमडेसिविर इंजेक्शन देण्याची गरज असते.

अशाप्रकारचे ३५ रुग्ण सध्या पालिकेच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. मात्र त्यांना देण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनच कुठे मिळत नसल्यानं या रुग्णांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पुढील २ दिवसात त्यांना इंजेक्शन न दिल्यास मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू ओढावू शकतो. मात्र रेमडेसिविर इंजेक्शनसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यापासून ते एफडीए, खासगी एजन्सी अशा सगळ्यांकडे मागणी करूनही आणि नगदी खरेदीची तयारी असूनही कुठेही इंजेक्शन मिळत नसल्यानं अंबरनाथ पालिका प्रशासन हतबल झालंय. त्यामुळे आता २५ पैकी १५ च्या पुढे HRCT स्कोअर असलेल्या रुग्णांना दाखलच करून घेऊ नका, अशा सूचना देण्याची दुर्दैवी वेळ नगरपालिका प्रशासनावर आलीये.

सरकारी कोव्हीड सेंटरची ही अवस्था असताना खासगी कोव्हीड केअर सेंटरची अवस्था तर आणखी बिकट आहे. कारण खासगी रुग्णालयांमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन सोबतच ऑक्सिजनचाही तुटवडा निर्माण झालाय. सध्या जवळपास प्रत्येक रुग्ण फुफ्फुसात संसर्ग झाल्यानंतरच दाखल होत असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ऑक्सिजन आणि रेमडेसिविर या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. शासनाने दोनच दिवसांपूर्वी थेट रुग्णालयांना इंजेक्शन पुरवण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी त्याची अद्याप अंमलबजावणी सुरू न झाल्यानं रुग्णाच्या नातेवाईकांची इंजेक्शनसाठी वणवण सुरू आहे.

इंजेक्शन अभावी डोळ्यादेखत रुग्णाचा मृत्यू पाहण्याची वेळ नातेवाईकांवर आलीये. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तातडीने रेमडेसिविर इंजेक्शन मिळाले नाहीत, तर २ दिवसांनी अंबरनाथ शहरात मृत्यूचं थैमान पाहायला मिळेल, अशी हतबलता डॉक्टरांनी व्यक्त केलीये. त्यामुळे शासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन अंबरनाथ शहराला तातडीने रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शहरात मृत्यूचं तांडव सुरू झाल्याशिवाय राहणार नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

#BreakTheChain : महाराष्ट्रात १५ दिवसांची संचारबंदी… जाणून घ्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणा!

MI vs KKR Live Score IPL 2021 | कोलकाताच्या डावाला सुरुवात