नांदेडमधील माहूर तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संत सेवालाल महाराज यांच्या 282 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बंजारा समाजातील लेंगी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरु आली होती. तिला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली. यावेळी कोरोना नियमांचे पालन झाले नाही. या कारणामुळे आयोजकांवर माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सारखानी येथे दरवर्षी संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. या जयंतीनिमित्ताने मागील सात वर्षांपासून लेंगी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा या स्पर्धेसाठी सैराट फेम आर्चीने उपस्थिती लावली. त्यामुळे अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती. गर्दीतील अनेकांनी मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे अशा स्वरुपाचे निष्काळजीपणाचे कृत्य करत कोरोना फैलावाची शक्यता निर्माण केली.
या प्रकरणी गर्दी जमवणारे आयोजक विशाल मधुकर जाधव, धनलाल नारायण राठोड,आशिष दयाराम राठोड,निलेश गोपा चव्हाण,विनोद प्रेमसिंग राठोड,विशाल दत्ता पवार या सहा जणांविरोधात कलम 188, 269,270 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
Comments
Loading…