in ,

केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून चीनचा कांगावा….

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारत-चीन सीमावादावर तोडगा अद्यापही निघलेला नाही. त्यातच आता चीनने केंद्रीय परिवहन राज्यमंत्री आणि माजी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंह यांच्या वक्तव्याचा आधार घेत भारतावर टीका केली आहे. भारतानेच एलएसी (लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल) उल्लंघन केल्याचा अजब- गजब दावा चीनने केला.

‘भारताने अनावधानाने का होईना, आपली चूक कबूल केली आहे. भारताकडून दीर्घकालावधीपासून एलएसीचे उल्लंघन केले जात आहे. हे एक प्रकारे चीनच्या सीमेत अतिक्रमण केल्यासारखे आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण होते. भारताची वागणूक हीच या प्रश्नाचे मूळ आहे. भारताने सीमेसंदर्भातील कराराचे कसोशिने पालन करावे,’ असे आवाहन चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्ही. के. सिंह यांच्या वक्तव्यानंतर केले आहे.

‘पूर्वी चिनी सैन्य भारतीय हद्दीत घुसून छावण्या बांधत होते आणि चर्चेनंतर त्या काही प्रमाणात मागे घेत होते. मात्र, वर्तमान सरकारने यावर ठोस निर्णय घेत यापुढे चीन असे करणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. चीन आता दबावात आहे. आता काही चूक झाल्यास भारत जशास तसे उत्तर द्यायला समर्थ आहे, हे चीनला समजले आहे, असे व्ही. के. सिंह यांनी म्हटले होते.

याचाच आधार घेत चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सनेही भारतावर आगपाखड केली आहे. ‘भारत सरकारमधील मंत्री व्ही. के. सिंह जे पूर्वी भारतीय सैन्याचे प्रमुख होते, त्यांनी चुकून भारत-चीन सीमेवरील सत्य सर्वांसमोर मांडले आहे. भारताकडूनच सीमा बदलण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याची उत्तरे चीनला द्यायला लागतात,’ असे ग्लोबल टाइम्सच्या संपादकांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यावेळी मांडलेली भूमिका मात्र वेगळी होती. भारताने अधिकृतरित्या दिलेल्या माहितीपेक्षा व्ही. के. सिंह यांचे वक्तव्य एकदम वेगळे असल्याचे दिसत आहे. भारताने कधीही एलएसीचे उल्लंघन केले नसल्याचे तेव्हा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुलुंड चेक नाक्याजवळ मॉडेल कॉलनीत आग

कोरोना चीनच्या वुहान लॅबमधून पसरला? WHOचा दावा