भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आज इंग्लंडने भारताचा धुव्वा उडवला आहे. इंग्लंडने भारताच्या 337 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. पुण्याच्या गहुंजे मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात इंग्लंडने भारतीय गोलंदाजांचा धुव्वा उडवला.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने ओपनिंग करत 50 षटकांत 6 बाद 336 धावा केल्या. भारताकडून के.एल. राहुलने शतक ठोकले. मात्र, इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, बेन स्टोक्स यांनी भारताच्या गोलंदाजांवर आक्रमण करत 43.3 षटकातच हे आव्हान पूर्ण केले.
भारताच्या 337 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉयने दमदार सुरुवात केली. 10 षटकात इंग्लंडने बिनबाद 59 धावा केल्या. पहिल्या सामन्याप्रमाणे या दोघांनी चमकदार खेळ करत संघाला शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. जेसन रॉयने 7 चौकार आणि एका षटकारासह 55 धावांची खेळी केली.
बेन स्टोक्स आणि बेअरस्टो यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला 25 षटकात 1 बाद 167 धावांपर्यंत नेले. संघाला दोनशेपार पोहोचवल्यानंतर बेअरस्टोने कुलदीपला षटकार खेचत आपले शतक पूर्ण केले. बेअरस्टोच्या शतकानंतर बेन स्टोक्सने अर्धशतक पूर्ण केले. स्टोक्स आणि बेअरस्टो यांनी 175 धावांची भागीदारी रचली.
दोन्ही संघातील तिसरा सामना आणि निर्णायक एकदिवसीय सामना 28 मार्च रोजी पुण्यात खेळवला जाईल.
Comments
Loading…