लोकशाही न्यूज नेटवर्क
पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका २१ वर्षाय पर्यावरण कार्यकर्ता आणि विद्यार्थी असलेल्या दिशा रवि या तरुणीला अटक केलं आहे. तिच्या बंगळुरूतील घरातून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं असून, शेतकरी आंदोलनासंदर्भात असलेल्या टूलकिटमध्ये बदल केल्याचा तिच्यावर आरोप आहे. याप्रकरणी ४ फेब्रुवारी रोजी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. सरकारचं मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलक शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. या रॅलीनंतर दिल्लीत हिंसाचार झाला. त्यानंतर सरकारनं शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्याबरोबरच इंटरनेट सेवाही बंद केली होती. याप्रकरणी पॉपस्टार सिंगर रिहानाबरोबर पर्यावरण कार्यकर्ता असलेल्या ग्रेटा थनबर्गने ट्विट करत शेतकऱ्यांना पाठिंबा दिला होता. त्याचबरोबर ग्रेटाने एक टूलकिट ट्विट केली होती. जी नंतर डिलीट करण्यात आली.
ग्रेटा थनबर्गने हवामान बदलाच्या मुद्द्यावरून शाळेत संप केल्यानंतर २०१८ पासून जागतिक पातळीवर हवामान बदलांविरुद्ध चळवळ उभी राहिली आहे. दिशा हवामान बदलांशी संबधित फ्रायडे फॉर फ्यूचर या अभियानाची संस्थापक सदस्य आहे. पोलिसांनी दिशाची चौकशी केली. आपण टूलकिटमध्ये बदल करून पुढे पाठवल्याची कबूली तिने दिली असल्याचं दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
Comments
Loading…