in

रोहिणी निनावे यांची ‘चंदेरी लेखणी’, लेखन प्रवासाला पूर्ण झाली 25 वर्षे

मराठी आणि हिंदी मालिकांच्या सुप्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावे यांच्या लेखन प्रवासास नुकतीच पंचवीस वर्षॆं पूर्ण झाली. त्यानिमित्ताने स्नेह भेटीचा कार्यक्रम “चंदेरी लेखणी “कोहिनूर कॉन्टिनेंटल, अंधेरी येथे आयोजित केला गेला होता. प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक महेश कोठारे, ख्यातनाम संगीतकार अशोक पत्की यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा रंगला. त्यांच्या या प्रवासाची साक्षीदार असलेली मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज मंडळी गायक, अभिनेते, अभिनेत्री, निर्माते, दिगदर्शक आवर्जून “चंदेरी लेखणी” या कार्यक्रमाला उपस्थित होते.

गायिका जान्हवी प्रभू अरोरा यांनी रोहिणी निनावे यांनी लिहिलेल्या मालिकांच्या गाजलेल्या शीर्षक गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. निवेदिका उत्तरा मोने यांनी निवेदनाची सर्व धुरा सांभाळत त्यांची मुलाखत घेतली आणि बऱ्याच गोष्टी नव्याने उलगडत गेल्या. रोहिणी निनावे म्हणाल्या की पंचवीस वर्ष कशी निघून गेली ते कळलंच नाही. मी कृतार्थ आहे की माझ्या हातून काही चांगलं लिहिल्या गेलं. मला पदोपदी चांगली माणसं भेटत गेली. हे लिहिणे कधीच थांबणार नाही, मी शेवटच्या श्वासापर्यंत लिहीत राहीन !

मराठी भाषेतील पहिली दैनंदिन मालिका दामिनी लेखिका रोहिणी निनावे यांनी लिहिली . दामिनीच्या अभूतपूर्व यशानंतर आपल्या पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीत दामिनी, अवंतिका, अवघाचि संसार, माझ्या नवऱ्याची बायको, अग्गं बाई सासूबाई, मुलगी झाली हो, अजूनही बरसात आहे तसंच हिंदी मधील कुसुम, संजीवनी, इस प्यार को मै क्या नाम दूं, दिल से दिया वचन, प्यार का दर्द है, यहाँ मैं घर घर खेली यांसारख्या 72 मालिकांच्या तब्बल 12 हजार पेक्षा जास्त भागांचे त्यांनी लिखाण केले आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश मालिकांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले. यातील अनेक कलाकार त्यांच्या व्यक्तिरेखेच्या नावावरुनच आज देखील ओळखले जातात. ’चंदेरी लेखणी’ या कार्यक्रमाला उपस्थित सर्व कलाकारांनी रोहिणी निनावे यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देवेंद्र फडणवीसांचा ढोंगीपणा जनतेसमोर – नाना पटोले

नवरात्रीनिमित्त साकारली 340 चौरस फुट रांगोळी