केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत विविध राज्यांत जाऊन किसान महापंचायतींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संबोधित करत, राकेश टिकैत यांनी पीकांचा त्याग करण्यास तयार राहावे, असे आवाहन केले होते. या आवाहनानंतर पंजाब आणि हरियाणामधील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या उभ्या पीकांवर ट्रॅक्टर फिरवून ती नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अंबाला येथील एका शेतकऱ्याने तयार असलेले गहूचे पीक नष्ट केले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर भारतीय किसान युनियनचे नेते गुलाब सिंग घटनास्थळी दाखल झाले. शेतकऱ्यांनी आपली पीके नष्ट करू नयेत. तयार झालेली पीके गरीब किंवा गरजूंना दान करावी, असे गुलाब सिंग यांनी सांगितल्याचे समजते.
शेतकऱ्यांनी पीके नष्ट करू नयेत
शेतकरी आपल्या पीकांची मुलांप्रमाणे काळजी घेत असतात. असे असताना पीके नष्ट करणे योग्य नाही. आपल्या देशात कुपोषणाची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे गरजू व्यक्तींना तयार अन्न-धान्य द्यावे अथवा ते आंदोलनात दान करावे, असे आवाहन गुलाब सिंग यांनी यावेळी केले. दरम्यान, राकेश टिकैत यांनी ही बाब समजल्यावर उभी पीके नष्ट करू नयेत, असे आवाहन त्यांनी केल्याचे सांगितले जात आहे.
Comments
Loading…