केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमांवर अद्यापही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले नाही, तर आता संसदेला घेराव घातला जाईल. त्यावेळी चार लाख नाही, तर चाळीस लाख ट्रॅक्टर येतील. शेतकऱ्यांनी तयार राहावे. कोणत्याही क्षणी दिल्लीला येण्याचे आवाहन केले जाऊ शकते, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला इशारा दिला आहे.
केंद्राने कान उघडे ठेवून ऐकावे. शेतकरी तिथेच आहेत आणि ट्रॅक्टरही तिथेच आहेत. शेतकरी इंडिया गेटवर पेरणी करतील आणि पीकेही घेतील, असा टोला राकेश टिकैत यांनी लगावला.
शेतकऱ्यांना बदनाम करण्याचा कट
संसदेला घेराव घालायचा की नाही, याचा अंतिम निर्णय संयुक्त किसान मोर्चाचा असेल. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर शेतकऱ्यांना बदनाम करण्याचा कट आखला जात आहे. देशभरातील शेतकऱ्यांना तिरंगा आपला वाटतो. पण देशातील नेत्यांना तसे वाटत नाही, असा आरोपही राकेश टिकैत यांनी यावेळी केला.
केंद्राला थेट इशारा
केंद्राने कृषी कायदे मागे घेतले नाहीत, तर मोठ्या कंपन्यांचे गोदामे उद्ध्वस्त करण्याचे काम शेतकरी करेल, असे खुले आव्हान देत संसदेला घेराव घालण्याविषयी लवकरच तारीख जाहीर केली जाईल, असे राकेश टिकैत यांनी सांगितले.
Comments
Loading…