in

असंच काहीसं आवडलेलं…

आज मी गाण्याबद्दल सांगणार आहे. मला संगीतातलं काही कळतं का? तर काहीsssही नाही! कानांना गोड लागणारं संगीत, भावपूर्ण गीत अन् सुमधूर आवाज… बस् इतकेच निकष! मला एवढंच कळतं. त्यात आणखी सांगायचं झालं तर, ‘वा, मस्त’ असं सहजरीत्या तोंडातून निघेल, असं सादरीकरण. मी सांगतोय ते जुन्या चित्रपटगीतांबद्दल अन् गायकांबद्दल! काही नव्या कथित गायकांबद्दल ‘मी का’ बोलू ?

याचा संदर्भ एवढाच की, 2015 सालच्या ‘दिल धडकने दो’ चित्रपटातील ‘गल्लन गूडियाँ’ या गाण्याबद्दल मित्रांशी बोलत होतो. हे गाणं ‘वन टेक’मध्ये ‘शूट’ केलंय. नंतर मी इंटरनेटवर सर्च केलं की, असं ‘वन टेक’मध्ये चित्रित झालेलं पहिलं गाणं कोणतं? ‘आराधना’ चित्रपटातील ‘रुप तेरा मस्ताना…’ हे गाणं पहिलं गाणं. 1969 सालंच.

त्या काळात काही चांगले-चांगले प्रयोग झाले होते. गुरुदत्त यांची निर्मिती असलेला ‘साहिब, बीबी और गुलाम’ (1962) चित्रपटातलं ‘साकिया आज मुझे निंद नहीं आयेगी…’ या गाण्याचं सादरीकरण खूपच वैशिष्ट्यपूर्ण होतं. आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं मिनू मुमताज हिच्यावर चित्रीत आहे. तिच्या समवेतच्या नर्तिका या संपूर्ण गाण्यात सावलीतच आहेत. त्यांचे चेहरेच दिसत नाहीत. दिसलेच तरी काही सेकंदांपुरतेच, तेही मुव्हमेन्टमुळे! असं गाणं आजपर्यंत पाहण्यात आलेलं नाही.

असंच ‘धरती माता’ (1938) या चित्रपटातील ‘दुनिया रंगरंगीली…’ या गाण्याबद्दल बोलता येईल. के. सी. डे, उमा शशी आणि कुंदनलाल सहेगल यांनी गायलेलं हे गाणं एका पाठोपाठ एक अशा सलग तीन कडव्यांचं आहे. त्यावेळी तंत्रज्ञान एवढं अ‍ॅडव्हान्स नसल्यानं तसं गाणं चित्रित करण्यात आलं असेल. कारण ती नुकतीच सुरुवात होती.

1955 सालच्या ‘श्री 420’ या सिनेमातलं ‘रमैया वस्तावयाँ…’ हे गाणं देखील वैशिष्ट्यपूर्ण म्हणावं लागेल. या गाण्यात नर्गिसला गाताना दाखवण्यासाठी वेगळी कल्पना मांडली आहे. एका रस्त्याच्या कडेला एका वस्तीत हे गाणं सुरू असतं, दोन कडवी झाल्यानंतर भाजीवाल्याची असते तशी गाडी एक जण ढकलत नेत असतो आणि त्या गाडीवर एक जण बुलबुल तरंगवर हेच गाणं वाजवतो. त्यानंतर व्हिक्टोरियात बसलेले देखील हेच गाणं म्हणत जातात. तर, एक दुधवाला सायकलवरून हे गाणं गुणगुणत नर्गिससमोरून जातो आणि लगेच नर्गिस गाणं कंटिन्यू करते – ‘याद आती रही…’

——————————-

चित्रपटातल्या गाण्यांच्या बाबतीत मी सरळसरळ दोन गट करतो. एक ऐकण्यास तसेच बघण्यास योग्य आणि दुसरी केवळ ऐकायलाच चांगली. प्रदीप कुमार, भारत भूषण, विश्वजीत वगैरे मंडळींची गाणी बघण्यासाठी नाहीतच. ती केवळ ऐकावीत. मला तर वाटतं, दिग्गज गायकांमुळेच त्यांना प्रसिद्धीचा ‘हात’ मिळाला असावा.

‘प्यार का मौसम’ सिनेमातलं ‘तुम बिन जाऊँ कहाँ..’ हे गाणं. शशी कपूर आणि आशा पारेख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात हे गाणं दोन वेळा आहे, एक मोहम्मद रफी यांच्या आवाजात तर, दुसरं किशोर कुमार यांच्या आवाजात. गम्मत अशी की, शशी कपूरवर चित्रीत गाणं गायलंय रफी यांनी आणि भारत भूषण याच्यावरील गाणं किशोर कुमारनं! (यात गैर काय? असं म्हणता येईल, पण मला मात्र हे खटकलं.)

‘अजब है दास्ताँ, तेरी ऐ जिंदगी…’ हे लोकप्रिय गाणं ‘शरारत’ या चित्रपटातलं आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य असं की, समोर स्क्रीनवर किशोर कुमार आहे आणि आवाज आहे, मोहम्मद रफी यांचा! नेटवर हे गाणं सर्च करता-करता मला आणखी तीन गाणी मिळाली, ज्यात किशोर कुमार यांना रफीनं आवाज दिलाय.

तर, ‘दूर का राही’ या सिनेमातलं ‘बेकरार दिल तू गाये जा…’ हे किशोर कुमार यांचं सुपरहिट गाणं पडद्यावर अशोक कुमार गाताना दिसतात आणि समोर आहे किशोर कुमार! याशिवाय, ‘आँखों ही आँखों में इशारा हो गया…’ या गाण्यात मोहम्मद रफी यांना एवढी एकच ओळ आहे. प्रत्येक कडव्याच्या शेवटी ते हीच एक ओळ गातात आणि संपूर्ण गाणं आहे गीता दत्त यांच्या आवाजात!

————-

यातल्या काही गोष्टी किंवा सर्वच गोष्टी ‘नवीन काय सांगितलंस?’ अशा प्रकारातल्या असू शकतात. पण माझाही नाइलाज आहे, कारण याला नावंच दिलं आहे, असंच काहीसं आवडलेलं…

  • मनोज जोशी

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

फायनल! दहावी आणि बारावी परीक्षा होणार वेळेतच आणि त्याही ऑफलाइन!

हाफकिनमध्ये होणार कोरोना प्रतिबंधक लस? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा