लोकशाही न्यूज नेटवर्क
सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली असून मला विचाराल, तर मी कोणत्याही गोष्टीसाठी न्यायालयात मुळीच जाणार नाही, असे रंजन गोगोई यांनी म्हटलंय. त्या ठिकाणी तुम्हाला न्याय मिळत नाही, असे ते म्हणाले.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी लोकसभेतील भाषणात गोगोई यांच्यावरील अत्याचाराच्या आरोपांबाबत भाष्य केले होते. तसेच केंद्र सरकार त्यांच्यावर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित केला होता. आता रंजन गोगोई हे राज्यसभेवर खासदार आहेत. नुकतीच त्यांची एका वाहिनीने मुलाखत घेतली. गोगोई यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांचा त्यांनी स्वत:च निवाडा केला, अशी टिप्पणी महुआ मोईत्रा यांनी केली होती. त्यावर बोलताना गोगोई म्हणाले, की मोठ्या कंपन्यांना न्यायालयात जाऊन संधी घेणे परवडते, इतरांना नाही. जर तुम्ही न्यायालयात गेलात तर तुमचेच मळलेले कपडे धूत बसता. तुम्हाला न्याय मिळत नाही.
मोईत्रा यांच्या नावाचा उल्लेख टाळून गोगोई म्हणाले, की त्या महिला खासदाराला या प्रकरणातील योग्य गोष्टी माहीत नाहीत. त्या वेळी ते प्रकरण मी न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्याकडे दिले होते. त्यांनी यासंबंधी चौकशी समिती निवडली होती.
आपल्या देशाला पाच लाख कोटींची अर्थव्यवस्था हवी आहे. पण आपली न्यायव्यवस्था जीर्ण झालेली आहे. जेव्हा संस्थांची कार्यक्षमता कमी होते. तेव्हा वाईट अवस्था असते. २०२० हे कोरोनाचे वर्ष होते. त्यात कनिष्ठ न्यायालयात साठ लाख, उच्च न्यायालयात ३ लाख, सर्वोच्च न्यायालयात सात हजार खटल्यांची भर पडली. यामुळे न्यायव्यवस्थेवरील ताण आणखी वाढला आहे.
भोपाळच्या राष्ट्रीय न्यायिक अकादमीत काय शिकवतात, सागरी कायदे, इतर कायदे, त्याचा न्यायिक नीतितत्त्वांशी काही संबंध नाही. निकाल कसा लिहावा हे शिकवले जात नाही. न्यायालयीन कामकाजात कसे वागावे हे शिकवले जात नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
Comments
Loading…