in ,

गरज सरो पटेल मरो; स्टेडियमवरून शिवसेनेची मोदींवर टीका

जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असलेल्या गुजरातमधील मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यावरुन विरोधक टीका करत असताना शिवसेनेनेही यावरुन नाराजी जाहीर केली आहे. गुजरातलाच सरदार पटेलांविषयी आस्था नसेल तर इतरांनी विरोधाच्या टिपऱ्या का बडवायच्या? अशी थेट विचारणा शिवसेनेने केली आहे. सरदार पटेलांचे महत्त्व नव्या राजकारणात संपले आहे. उद्या नेताजी बोसही संपतील. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा वापरही मागच्या निवडणुकीत झालाच होता. आता गरज सरो पटेल मरो हा त्याच नाटय़ाचा भाग आहे अशी टीका शिवसेनेने केली आहे.

“जगातली प्रत्येक मोठी गोष्ट गुजरातलाच करायची या ध्यासाने दिल्लीतील मोदी-शहांचे सरकार पछाडलेले दिसत आहे. त्यात काही चुकले असे वाटण्याचं कारण नाही. आपल्या मातीवर प्रेम असणे हा गुन्हा नाही, पण आपण देशाचे नेतृत्व करीत आहोत हे भान विसरून कसे चालेल!,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“मोदी यांचे नाव या मोठय़ा स्टेडियमला दिले हा टीकेचा विषय कसा काय होऊ शकतो? पण टीका यासाठी सुरू आहे की, मोटेरा स्टेडियमला आधी भारतरत्न सरदार पटेल यांचे नाव होते. ते बदलून मोदी यांचे नाव दिले. गुजरातमध्ये आधी सरदार पटेल यांचा जगातला सर्वात उंच पुतळा उभारण्यात आला.

“मोदी हे महान आहेतच. त्याविषयी शंका घेण्याचे कारण नाही, पण मोदी सरदार पटेल, महात्मा गांधी, पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधी यांच्यापेक्षाही महान आहेत असे मोदीभक्तांना वाटत असेल तर त्यास अंधभक्तीची पुढची पायरी मानावी लागेल,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.

“दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, मोदी यांचे नाव सरदार पटेलांच्या जागी दिले म्हणून इतके अकांडतांडव का करता? हा बदल त्यांच्या गुजरातच्या जनतेने स्वीकारला आहे. पाच महापालिका निवडणुकांत काँग्रेसचा दारुण पराभव झाला व भाजप विजयी झाला. सरदार पटेलांपेक्षा मोदी महान झाल्यानेच लोक त्यांना भरभरून मते देत आहेत. गुजरातलाच सरदार पटेलांविषयी आस्था नसेल तर इतरांनी विरोधाच्या टिपऱ्या का बडवायच्या?,” अशी शंत शिवसेनेने व्यक्त केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Hritik Roshan | ऋतिक रोशनला मुंबई क्राईम ब्रांचचं समन्स

Bharat Bandh | इंधन दरवाढ, जीएसटी, ई-वे बिलसाठी व्यापाऱ्यांकडून आज भारत बंद