मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. राज्यात मुख्यता: विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर नागपुरात नियम कडक करण्यात आले आहेत. मात्र नागपुराच कोणतंही लॉकडाऊन नसेल, असं पालकमंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं. राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुणे, नाशिक, बुलडाणा आणि अमरावती या जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. काही ठिकाणी निर्बंध लावण्यात आलं आहेत, तर काही ठिकाणी रात्रीची संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.
नागपुरात नियम कडक
नागपुरात वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे पालकमंत्री नितीन राऊत यांनी कठोर निर्बंध लावले आहेत. मात्र नागपूर लॉकडाऊन नसेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आठवडी बाजार 7 मार्चपर्यंत बंद राहणार आहे. यासह मुख्य बाजार पेठ शनिवार आणि रविवार बंद ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. 7 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस बंद राहणार आहेत. सर्व धार्मिक स्थळ, सामाजिक कार्यक्रमांना 7 मार्चपर्यंत परवानगी नसेल. हॉटेल, रेस्टोरेंट 50 टक्के क्षमतेने चालतील, मात्र रात्री 9 नंतर बंद ठेवण्यात येतील. मंगल कार्यालय 25 फेब्रुवारी ते 7 मार्च बंद राहतील तर, त्यानंतर 50 पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत घरी लग्न करता येतील. मात्र 7 मार्च आधी मंगलकार्यालयात लग्न करण्याची परवानगी नसेल. धोका टाळण्यासाठी बंद असलेले कोविड सेंटर सुरु करण्यात येतील. सुरक्षेचा उपाय म्हणून नवीन हॉटस्पॉट शोधून कंटेंटंमेंट झोन निश्चित करण्यात येणार, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे.
रविवारी रुग्णांच्या संख्येत वाढ
रविवारी नागपूर जिल्ह्यात 626 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यात नागपूर शहरातील 551 तर, ग्रामीणमधील 72 रुग्णांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यात शहरातील 4 ग्रामीणमधील 1 आणि जिल्ह्याबाहेरील 3 रुग्णांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 43 हजार 133 आहे, यामधे नागपूर शहरातील 1 लाख 14 हजार 228 तर ग्रामीण मधील 27 हजार 979 तर, जिल्ह्याबाहेरील 926 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात 4 हजार 275 रुगणाच मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 2 हजार 767 तर ग्रामीणमधील 764 रुग्णांचा समावेश तर जिल्ह्याबाहेरील 744 रुग्णांचा समावेश आहे.
हा धोका कमी व्हावा यासाठी नागपूरात विनामास्क फिरणाऱ्यांवर धडक कारवाईची मोहीम सुरु करण्यात आली आहे. यावेळी एका दिवसात विनामास्क फिरणाऱ्या 151 जणांवर कारवाई करण्यात आली. रविवारी 75 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर गेल्या काही महिन्यात शहरात 33 हजारपेक्षा जास्त जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी मनपाने जवळपास दीड कोटींचा दंड वसूल केला आहे.
राज्यात कुठे कुठे लॉकडाऊन
राज्यात पुणे, नाशिक, बुलडाणा, अमरावतीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. रविवारी नाशकात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रात्रीची संचारबंदी घोषित केली आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर 1 हजार रुपयाचा दंड आकारण्यात येईल. अमरावती व अचलपुरात एका आठवड्याचा लॉकडाऊन असणार आहे. तर तिकडे पुण्यात रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे.
Comments
Loading…