in

मराठी मातीशी नाते असलेले आंतरराष्ट्रीय अंपायर

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्ग टेस्ट आजपासून सुरू होत आहे. जोहान्सबर्ग टेस्टमध्ये अल्लाहुद्दीन पालेकर ग्राऊंड अंपायर म्हणून पदार्पण करणार आहेत. अल्लाहुद्दीन यांचे आजोबा रत्नागिरी जिल्ह्यातील खेडजवळच्या शीव गावचे. अनेक वर्षांपूर्वी ते दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले. अल्लाहुद्दीन यांचे वडीलही दक्षिण आफ्रिकेत अंपायर म्हणून काम करतात आणि आता त्यांचे चिरंजीवही आंतरराष्ट्रीय टेस्ट मॅचमध्ये अंपायरिंग करताना दिसणार आहेत.

यानिमित्ताने कोकणातल्या एका कुटुंबातील माणूस भारतीय संघ खेळत असलेल्या टेस्ट मॅचमध्ये अंपायरिंग करताना दिसणार आहे. 44वर्षीय पालेकर गेली 15 वर्ष अंपायरिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. याआधी त्यांनी वनडे आणि ट्वेन्टी20 प्रकारात अंपायरिंग केलं आहे. फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलेले पालेकर, दक्षिण आफ्रिकेचे ज्येष्ठ अंपायर मारइस इरॅसमस यांच्या बरोबरीने मैदानात उतरतील. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने एक पत्रक काढले आहे त्या पत्रकात पालेकर म्हणतात, “माझ्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. जेव्हा कोणीही अंपायरिंगला सुरुवात करतं तेव्हा त्याचं स्वप्न टेस्ट मॅचमध्ये अंपायरिंग करणं हे असतं. मी 15 वर्षांपूर्वी अंपायरिंगला सुरुवात केली. या कामात अथक मेहनत आहे. खूप सारा संयम बाळगावा लागतो.”कुटुंबीयांकडून पाठिंबा तितकाच महत्त्वाचा असतो. माझ्या सुदैवाने मला कुटुंबीयांची नेहमीच साथ लाभली आहे. गेल्या अनेक वर्षात मी कोणत्याही कौटुंबिक समारंभांना उपस्थित राहू शकलेलो नाही. माझी पत्नी शकिराचं योगदानही महत्त्वाचं आहे. ती माझ्यासाठी आधारस्तंभ आहे. कोरोना काळात काम करणं सगळ्यांसाठीच कठीण आहे. त्यामुळे या काळात टेस्ट मॅचमध्ये अंपायरिंग करायला मिळणं हा सन्मान आहे,” असं पालेकर यांनी म्हटलं आहे.

क्रिकेट साऊथ आफ्रिकेने दिलेल्या माहितीनुसार, अलाहुद्दीन यांचे वडील जमालोद्दीन हेही अंपायरिंग क्षेत्रातच आहेत. केपटाऊनमधल्या वेनबर्ग हायस्कूलमध्ये ते कार्यरत आहेत. सत्तरीत असलेले जमालोद्दीन यांनी 90च्या दशकात दक्षिण आफ्रिकेतील महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये अंपायरिंग केलं आहे. जमालोद्दीन यांचे बंधू म्हणजे अलाहुद्दीन यांचे काका हेही अंपायर आहेत. अलाहुद्दीन यांची भावंडंही याच क्षेत्रात आहेत.


“माझे वडील माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांना फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये अंपायरिंग करायचं होतं. पण काही कारणांमुळे ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. त्यांच्याकडून मिळालेला अंपायरिंगचा वारसा मी पुढे चालवत आहे,” असं पालेकर यांनी सांगितलं.


अंपायरिंगमध्ये पाकिस्तानचे अलीम दार यांचं मार्गदर्शन मोलाचं आहे. 2012 मध्ये न्यूझीलंडमध्ये दार यांच्या बरोबर आठवडाभर होतो. त्या काळात अंपायरिंग संदर्भात अनेक बारकावे शिकता आले. दक्षिण आफ्रिकेचे मारइस इरॅसमस यांचं मार्गदर्शन नेहमीच मिळतं. गेली अनेक वर्ष आयसीसीच्या एलिट पॅनेल अंपायर म्हणून ते कार्यरत आहेत”, असं पालेकर यांनी सांगितलं.अंपायरिंगला सुरुवात करण्यापूर्वी अलाहुद्दीन फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायचे. वेस्टर्न प्रोव्हिन्स आणि टायटन्स संघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. या संघांकडून फॅफ डू प्लेसिस, एबी डीव्हिलियर्स, डेल स्टेन असे खेळाडू खेळले आहेत.

वानखेडेवर नाकारला होता प्रवेश

काही वर्षांपूर्वी कौटुंबिक कारणांसाठी भारतात आलेल्या पालेकर यांना वानखेडे मैदानावर प्रवेश नाकारण्यात आला होता. पण योगायोग म्हणजे याच वानखेडे मैदानावर पालेकर यांना अंपायरिंग करण्याची संधी मिळाली होती.बीसीसीआयच्या अंपायर्स एक्स्चेंज प्रोग्रॅम अंतर्गत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे अंपायर भारतातल्या रणजी करंडक स्पर्धेत अंपायरिंग करतात. याच योजनेअंतर्गत पालेकर यांनी भारतात अंपायरिंग केलं.2015 मध्ये वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यातील सामन्यासाठी पालेकर अंपायर होते. क्रिकेटचं माहेरघर असणाऱ्या मुंबईत अंपायरिंग करायला मिळणं खास आहे असं पालेकर म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी चेन्नईत तामिळनाडू आणि मध्य प्रदेश यांच्यातील सामन्यासाठी अंपायरिंग केलं होतं.


2018 मध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना पालेकर यांनी ट्वेन्टी-20 सामन्यात ग्राऊंड अंपायर म्हणून पदार्पण केलं.त्या मॅचमध्ये ज्युनियर डालाच्या बॉलिंगवर रोहित शर्माविरुद्ध अपील झालं. पालेकर यांनी रोहित बाद असल्याचा कौल दिला होता. कोरोना संकटाने मिळवून दिली टेस्ट अंपायरिंगची संधी आयसीसी म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमानुसार, टेस्ट मॅचसाठी तटस्थ देशांच्या पंचांची नियुक्ती केली जाते. जेणेकरून निःपक्षपातीपणे निर्णय देता यावेत. त्याच देशाचे अंपायर्स असतील तर यजमान संघाला विनाकारण फायदा मिळायला नको या दृष्टिकोनातून आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. टेस्ट मॅचेससाठी एलिट पॅनेल अंपायर्समध्ये असणाऱ्या अंपायरची नियुक्ती केली जाते.


What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोरोना पॉझिटिव्ह

20 हजारांचा आकडा पार झाला तर लॉकडाऊन…,किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य