लोकशाही न्यूज नेटवर्क
वसई जवळच्या नायगाव रेल्वे पूलाला एका मोठ्या जहाजाने धडक दिली असून या धडकेत रेल्वे पुलाच्या दोन पिलरमधील मधल्या भागांचं बऱ्यापैकी नुकसान झालं आहे. शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास ही घटना घडली आहे.
एक भला मोठा ड्रेझर दोन पुलाच्या खालून पास होताना पुलाला धडकला. यामुळे रेल्वे पुलाला काही ठिकाणी तडे गेलेले आहे तर काँक्रिटचा भागदेखील मोठ्या प्रमाणावर निखळून पडला आहे. जवळपास अर्धा ते एक फुटाचं काँक्रिट या अपघातात निघालं आहे. तर ही घटना घडल्यानंतर ड्रेझर हा पूर्णपणे पाण्यात बुडाल्याचे समजते. दोन दिवसांनंतरही ड्रेझर पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आहे. हा ड्रेझर जवळपास ५० फूट लांब आणि २० ते २५ फूट रुंद असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या घटनेची माहिती माणिकपूर पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. आतापर्यंत तीन वेळा अशा प्रकारची घटना घडल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. याआधी २०१४ मध्येही असाच मोठा अपघात येथे घडला होता. मात्र हे ड्रेझर नेमके येतात कुठून? व ते जातात कुठे? आणि यांना नेमकी परवानगी आहे का ? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. दरम्यान या धक्कादायक घटनेने रेल्वे पुलाचा बऱयापैकी काही भाग तुटल्याने या पुलाची तात्काळ पाहणी करून तो कितपत निकामी झाला आहे हे पाहावं लागणार आहे.
Comments
Loading…