लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार रंगनाथ पठारे यांना तर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ. सुधीर रसाळ यांना प्रदान करण्यात येणार आहे.
याशिवाय, श्री. पु. भागवत पुरस्कार शब्दालय प्रकाशन, कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार संजय जनार्दन भगत आणि मराठी साहित्य परिषद, आंध्रप्रदेश यांना देण्यात येत असल्याची घोषणा मराठी भाषा विभाग व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली. मराठी भाषा गौरवदिनी, 27 फेब्रुवारी रोजी रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित एका सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.
विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराचे स्वरुप 5 लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. रंगनाथ पठारे यांनी राज्य सरकारच्या अभिजात मराठी भाषा समिती व अभिजात मराठी भाषा मसुदा उपसमितीचे अध्यक्ष, साहित्य अकादमी मराठी भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृतीमंडळाचे सदस्य, वाङ्मय पुरस्कार निवड समित्यांचे अध्यक्ष व सदस्यपद भूषविलेले आहे.
यावर्षीचा श्री. पु. भागवत पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील शब्दालय प्रकाशन यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरुप 3 लाख रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. मराठी भाषा अभ्यासक पुरस्काराचे स्वरुप 2 लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. डॉ. रसाळ यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 35 वर्षे मराठीचे अध्यापन केले असून गेली 60 वर्षे ते मराठी भाषा, मराठी वाङ्मय आणि मराठी संस्कृती या क्षेत्रात लेखन करीत आहेत.
कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार संजय जनार्दन भगत व मराठी साहित्य परिषद, आंध्रप्रदेश यांना घोषित करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरुप प्रत्येकी 2 लक्ष रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. संजय भगत यांनी राज्य शासनाच्या भाषा संचालनालयाने तयार केलेल्या परिभाषा कोश सामान्य जनतेपर्यंत प्रथम संगणक माध्यमातून पोहचविण्याचे कार्य केले. तसेच आधुनिक तंत्रानुसार शासकीय कोश सर्व लोकांना पाहता यावे यासाठी स्वखर्चाने आधुनिकीकरण करून घेतले. तर मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश यांच्यामार्फत विविध प्रकाशने प्रकाशित होतात.
Comments
Loading…