in

महाड दुर्घटना; संसारासह सारचं जमिनीत मिसळल…मात्र आपत्ती आली तरी संजगता महत्वाची

भारत गोरेगावकर : माणसाचे नैसर्गिक आपत्तीपुढे काही चालत नाही. मात्र येणाऱ्या आपत्तीतून बोध घेण गरजेचे असते, त्याचा अभ्यास करून भविष्यात अशा आपत्ती उद्भवल्या तर त्यातून कमीतकमी जिवीत आणि वित्त हानी कशी होईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. महाडच्या इमारत दुर्घटनेतून प्रशासन नेमका कोणता बोध घेते हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

रायगड जिल्ह्यात अशा आपत्ती येण्याची हि काही पहिली वेळ नाही. जिल्ह्यात दरवर्षी महाड, रोहा, नागठणे आणि आपटा परीसराला पुरस्थितीला सामोर जावे लागते. डोंगरा लगतच्या परीसरात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. यामुळे अनेक जणांचे जीव गेले आहेत. तीन वर्षापुर्वी महाड येथेच सावित्री नदीवरील पुल अतिवृष्टीने वाहून गेला. यामुळे झालेल्या दुर्घटनेत चाळीस जणांचा बळी गेला. अलिकडच्या काळात निसर्ग वादळाचा जिल्ह्याला तडाखा बसला. दोन लाख घरे वादळाने उध्वस्त झाली.

या आपत्तीतून सावरत असतांनाच आता महाड मध्ये आठ वर्षांपुर्वी बांधलेली इमारत कोसळली. काकरपुरा परिसरातील पाच मजली तारीक गार्डन मंजील इमारत 24 ऑगस्टला सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास पडली. यात 16 जणांचे जीव गेले. तर 9 जण जखमी झाले.45 कुटूंबांचे संसार आपत्तीने उघड्यावर आले. घर गेले घारातील माणसे गेली आणि घरातील सामानही गेले. आज मातीच्या ढिगाऱ्यात उध्वस्त संसाराच्या खुणा चाचपडण्याची वेळ आपदग्रस्तांवर आली आहे. आपत्ती येतात आणि जातात. त्यात महत्वाची असते ती सज्जता, अशा आपत्तींना तोंड देण्यासाठी तुम्ही किती सक्षम आणि सजग आहात हे महत्वाचे असते.

त्यामुळे अशा आपत्तीनंतर प्रत्येक वेळी आपत्ती व्यवस्थापनातील तृटी तपासणे गरजेचे असते. 24 तारखेला सायंकाळी साडे सहा वाजता हि दुर्घटना घडली. यानंतर पुण्याहून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला मदतीसाठी पाचारण करण्यात आले होते. पण जवळपास पाच तासांनी एनडीआरएफची पथके घटनास्थळी दाखल झाली. ग्रीन कॉरीडोर तयार करूनही पथकांना घटनास्थळी दाखल होण्यास पाच तासांचा कालावधी लागला.  त्यानंतर मध्यरात्री एक वाजता मदत व बचाव कार्याला सुरवात केली. यात सहा तास उलटून गेले. दुर्घटनेच्या जवळपास सोळा तासांनंतर बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह बचाव पथकांना सापडायला सुरवात झाली. जसा वेळ पुढे सरकत गेला तशी ढिगाऱ्याखाली दबलेल्या व्यक्ती जिवंत सापडण्याची शक्यता धुसर होत गेली. त्यामुळे भविष्यात अशा आपत्ती आल्या तर त्यांना तातडीची मदत कशी मिळू शकेल यासाठी पाऊले उचलणे आवश्यक आहे.

आंबेनळी बस दुर्घटनेच्या वेळीही मदत व बचाव पथके घटनेच्या जवळपास नऊ तासांनी दाखल झाली होती. दुर्घटनेचा काळात हि दिरंगाई जीवघेणी ठरते याचा प्रत्यय त्यावेळी आला होतो, दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला होता. सतत होणाऱ्या या घटना लक्षात घेऊन कोकणात एनडीआरएफ चा कायम स्वरूपी तळ उभारणे आवश्यक आहे. हे महाड येथील दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा समोर आले आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने उशीरा का होईना पाऊले उचलण्यास सुरवात केली आहे हे ही नसे थोडके. मात्र हा प्रस्ताव तातडीने मार्गी लावणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात आजही 530 हून अधिक धोकादायक इमारती आहेत. या इमारतीत आजही अनेक लोक राहत आहेत. त्यांमुळे महाड दुर्घटनेनंतर धोकादायक इमारतींचे फेरसर्वेक्षण करणे आवश्यक आहे. त्यातील नागरीकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करणेही आवश्यक आहे. आजवर मुंबई, पुणे, ठाणे सारख्या महानगरात इमारत कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र रायगड जिल्ह्यातील निमशहरी भागात इमारत कोसळण्याची हि पहिलीच वेळ होती. त्यामुळे हि आपत्ती केवळ शहरीभागापुरती मर्यादीत राहीली नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.  

महाडची इमारत हि आठ वर्षांपुर्वीच बांधण्यात आली होती. त्यामुळे ती नवीन होती. तरीही निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे ती पडली. इमारतीला ऑक्युपेशनल सर्टीफिकेट देतांना नगरपालिकेनी तिची तपासणी करणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नसल्याचे दुर्घटनेनंतर स्पष्ट झाले आहे. इमारतीचा पायाच इमारतीचे वजन पेलण्यास सक्षम नव्हता त्यामुळे हि दुर्घटना घडली. त्यामुळे यापुढील पुढील काळात इमारतीचे बांधकाम पुर्ण झाल्यावर ते बांधकाम लोकांच्या राहण्यासाठी योग्य आहे अथवा नाही यांची तपासणी करण्यारी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक आहे, महाडच्या दुर्घटनेनंतर प्रशासन बोध घेऊन पाऊले उचलेले अशी अपेक्षा आहे. तारीक गार्डन या इमारतीसह येथील नागरिकांवरती आलेले संकट निसर्ग नाही तर मानव निर्मित होते म्हणून पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. सोळा निष्पाप जणांचे बळी ज्यांनी घेतले त्यांच्या वरती योग्य ती कारवाई केली गेली तरच अशा तकलादू इमारती उभ्या करून पैशाच्या हव्यासापोटी जीवांशी खेळणाऱ्या मौत का सौदागरांना जरब बसेल आणि जनतेचा व्यवस्थेवरील विश्वास ही टिकून राहील अन्यथा रात गयी बात गयी याप्रमाणेच होत गेले तर मानव निर्मित संकटातून देखील कधीही सुटका होणार नाही.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Shantabai Pawar आजींचा लाठ्या काठ्यांचा खेळ…जेव्हा व्यवस्थेला ‘मर्दानी’वर आणतो!

Lokshahi Impact; जेवणात सापडलेल्या अळी प्रकरणी दिले चौकशीचे आदेश