अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने दिग्दर्शक मंदार देवस्थळीवर कलाकारांचे मानधन थकवल्याचा आरोप होता. या संदर्भात मंदार देवस्थळी याने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. “मीसुद्धा बिकट आर्थिक परिस्थितीतून जात आहे, मी खरंच वाईट माणूस नाही, माझी परिस्थिती वाईट आहे.”असं स्पष्टीकरण मंदार देवस्थळी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिलं आहे.
‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमुळे प्रकाशझोतात आलेली मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शर्मिष्ठाने प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आहे. कृपया बोला, घाबरू नका, असेही तिने म्हटले आहे. ‘हे मन बावरे’ या मालिकेत शर्मिष्ठा काम करत होती. शर्मिष्ठा प्रमाणेच मृणाल दुसानीस, संग्राम साळवी , विदिशा म्हसकर या कलाकारांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत शर्मिष्ठाला पाठिंबा दिला आहे. त्यांचेही पैसे थकवल्याचा आरोप या कलाकारांनी केला आहे.
या सर्व आरोपांनंतर मंदार देवस्थळी यांनी स्पष्टीकरण दिले आह की, तो सध्या अतिशय बिकट आर्थिक परिस्थितीतून जात असून, त्याला कोणाचेच पैसे बुडवायचे नाही आहे. आर्थिक परिस्थिती थोडी सुधारल्यावर सर्वांचे पैसे देईन. असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
काय आहे फेसबुक पोस्ट?
“नमस्कार, मी अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांशी बोलतोय, मला पूर्ण जाणीव आहे की प्रत्येकालाच पैशांची गरज आहे, माझ्याकडून तुम्हा सगळ्यांचं पेमेंट थकलं आहे, तुमचं म्हणणं योग्यच आहे, तुम्ही तुमच्या जागी बरोबरच आहात, पण मीसुद्धा अत्यंत आर्थिक बिकट परिस्थितीमधून जात आहे, मला खूप लॉस झाला आहे, त्यामुळे आता पैसे देण्याची माझी खरंच परिस्थिती नाही, पण मी तुमच्या सगळ्यांचे सगळे पैसे देईन, अगदी टॅक्ससकट, फक्त मला थोडा वेळ हवा आहे, कोणाचेच पैसे बुडवायचे माझ्या मनात नाही, तशी माझी इच्छाही नाही, पण आत्ता माझ्यावर सुद्धा आर्थिक संकट कोसळलंय. मी खरंच वाईट माणूस नाही, माझी परिस्थिती वाईट आहे, मी यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतोय, देवांच्या कृपेने लवकरच परिस्थिती बदलावी इतकीच मनापासून इच्छा आहे आणि देवाकडे प्रार्थना… आतापर्यंत जो काही तुम्ही सपोर्ट केलात त्याबद्दल मी कायम तुमचा ऋणी आहे, आणि माझ्यामुळे जो काही त्रास सहन करावा लागतोय तुम्हाला त्याबद्दल मनापासून माफी मागतो” असं मंदार देवस्थळी यांनी लिहिलं आहे.
Comments
Loading…