in

Mansukh Hiren | मनसुख यांनी मृत्यूपूर्वी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून धक्कादायक माहिती समोर

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी सापडला. मनसुख यांचा मृत्यू हत्या की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. आपण पीडित असूनही पोलिसांकडून एखाद्या आरोपीप्रमाणे वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला होता. हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, ठाणे पोलीस आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्त यांना पाठवलं होतं.

मनसुख यांनी लिहिलेल्या पत्रात संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. या पत्रात विक्रोळी पोलीस स्टेशन, क्राईम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझे, एनआयए, घाटकोपर पोलीस स्टेशन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एका पत्रकाराच्या नावाचा उल्लेख आहे.

१७ फेब्रुवारीला संध्याकाळी ६ वाजता ठाण्याहून मुंबईला येत असताना स्कॉर्पिओ (MH 02 AY 2815) या गाडीमध्ये बिघाड झाल्यानं ती ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील नाहूर उड्डाणपुलाजवळ पार्क केली असं मनसुख यांनी पत्रात म्हटलं आहे. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी १२ वाजता गाडी पार्क केलेल्या ठिकाणी मेकॅनिकसह पोहोचलो असता स्कॉर्पिओ तिथं आढळून आली नाही. त्यामुळे विक्रोळी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली.

चौकशीमुळे मानसिक स्वास्थ बिघडल्याचा दावा
मनसुख हिरेन तक्रारीत पुढे म्हणतात, २७ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता विक्रोळी पोलीस ठाण्यातून फोन आला. त्यानंतर घाटकोपर पोलीस ठाण्यातून ३ वाजता फोन आला. १ मार्चला संध्याकाळी ४ वाजता नागपाडा एटीएसमधून फोन आला. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या सीआययू ऑफिसमध्ये बराच वेळ चौकशी करण्यात आली. बराच वेळ परत परत प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर एनआयएनं चौकशी केली. पोलीस सहआयुक्त भाम्रे यांनी चौकशी केली. विविध तपास यंत्रणांकडून झालेल्या चौकशीमुळे माझं मानसिक स्वास्थ बिघडलं. बऱ्याच माध्यमांच्या पत्रकारांकडून वारंवार फोन येत आहेत. एका पत्रकारानं फोन करुन या प्रकरणात मी संशयित असल्याचं सांगितलं.

त्रासापासून मुक्तता हवी
मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना लिहिलेल्या पत्रात पोलीस आणि पत्रकारांना छळ करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं नमूद केलं आहे. पोलिसांकडून वारंवार होणाऱ्या चौकशीच्या त्रासापासून संरक्षण मिळावं, अशी मागणी मनसुख हिरेन यांनी केली आहे. माझी आणि माझ्या कुटुंबाची पोलीस आणि पत्रकारांकडून होणाऱ्या त्रासापासून मुक्तता व्हावी, अशी मागणी मनसुख हिरेन यांनी पत्रातून केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘तपास यंत्रणांकडून मानसिक छळ होतोय’; मनसुख हिरेन यांनी केली होती तक्रार

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…