लोकशाही न्यूज नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आज भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना या भेटीबाबत माहिती दिली. आपण शरद पवार यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भेटल्याचे त्यांनी सांगितले.
उदयनराजे यावेळी म्हणाले, शरद पवार यांची भेट घेण्यामागचे मुख्य कारण म्हणजे, मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा होता. आमची एकच मागणी आहे, महाराष्ट्र शासनाकडून जेवढ्या गांभिर्याने बाजू मांडायला हवी होती, ती काही मांडली गेली नसल्यामुळे लोकांच्या मनात मोठी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे.
तसेच, आज मराठा समाजातील लोकांची एवढीच अपेक्षा आहे की, ज्याप्रमाणे अन्य समाजातील लोकांना आरक्षण दिले गेले. त्याचप्रमाणे कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता, आम्हाला देखील आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा समाजातील ज्येष्ठ व राजकारणात शरद पवार हे सक्रीय आहेत व आज राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसची जी सत्ता आहे, त्याचे सर्वेसर्वा शरद पवार असल्यामुळे एक वडिलकीच्या नात्याने त्यांनी यामध्ये लक्ष घालावे. अन्यथा फार मोठ्या प्रमाणावर उद्रेक होईल. शांततेत या अगोदर मोर्चे निघाले, पण जर आरक्षण मिळाले नाही, तर काय होईल हे सांगता येणार नाही, त्याची कल्पना देखील करता येणार नसल्याचा इशारा देखील या वेळी उदयनराजेंनी राज्य सरकारला दिला.
Comments
Loading…