ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी १०० युनिटपर्यंत वीज मोफत मिळेल, त्याचप्रमाणे कोरोना काळातील देयक माफ होईल, अशा काही घोषणा केल्या होत्या. त्यांची पूर्तता होण्याची शक्यता मावळी असतानाच राऊत यांनी आणखी एक घोषणा केली आहे. वीज देयकांची थकबाकी वसूल झाल्यावर १०० युनिटपर्यंत वीजमाफीवर विचार करू, असे त्यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले ऊर्जामंत्री राऊत?
ऊर्जा मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यावर १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा मी केली होती. त्यासाठी एक उच्चस्तरीय समितीही गठीत केली होती. परंतु याच काळात राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने समितीची एकही बैठक होऊ शकली नाही. काम थांबल्याने हा प्रस्तावच तयार होऊ शकला नाही. दरम्यान, कोरोना काळात महावितरणच्या ग्राहकांवरील वीज देयकाची थकबाकी वाढून ७१ हजार कोटींवर गेली. त्यामुळे महावितरण प्रचंड आर्थिक अडचणीत सापडली आहे.
महानिर्मितीलाही कोळसा खरेदी, कर्मचाऱ्यांचे वेतन, वीज यंत्रणेवरील विविध खर्चासाठी प्रचंड त्रास होत आहे. या स्थितीत ग्राहकांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत देणे शक्य नाही. त्यामुळे आता महावितरणकडून थकबाकी वसुलीवर जोर देण्यात आला आहे. ही थकबाकी वसूल झाल्यावर पुन्हा या विषयाचा अभ्यास करून ग्राहकांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्यावर विचार केला जाईल, असेही ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.
Comments
Loading…