लोकशाही न्यूज नेटवर्क
संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवा शब्द समोर आणला होता. हा शब्द होता ‘आंदोलनजीवी’… प्रत्येक आंदोलनात दिसणाऱ्यांवर निशाणा साधण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हा शब्द वापरला होता. परंतु, पंतप्रधानांच्या याच आंदोलनजीवी शब्दावरून आता सोशल मीडियावर ‘जीवी’ शब्द सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मंगळवारी राज्यसभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासोबतच्या आठवणी सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. यानंतर सोशल मीडियावर अश्रूजीवी हा देखील नवीन शब्द सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
याचबरोबर नरेंद्र मोदींनी आंदोलनजीवी म्हणून डिवचल्यानंतर नितीन गडकरींचा व्हिडीओ व्हायरल होतं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या व्हिडीओ सोबतच भाजप नेत्यांचे आंदोलनातील बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत.
नितीन गडकरी यांचा काँग्रेस नेते डॉ.मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यामध्ये नितीन गडकरींनी शांततापूर्ण आंदोलन करणं जनतेचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे.”पंतप्रधान जी गोष्ट सांगत आहेत ती लोकशाही विरोधी आहे, या देशात भ्रष्ट लोक आणि सरकारविरोधात आंदोलन करणं जनतेचा, विरोधकांचा, काम करणाऱ्यांचा अधिकार आहे. हा अधिकार आपल्याला काँग्रेसनं किंवा दिलेला नाही. तो अधिकार संविधानानं दिला आहे. मुलभूत अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असूनही शांततापूर्ण पद्धतीनं आंदोलन करु नये, असं वक्तव्य पंतप्रधान कसं म्हणू शकतात. हे योग्य आहे का याचं आत्मपरिक्षण पंतप्रधानांनी करावं”, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. नितीन गडकरींसोबत व्हिडीओमध्ये सध्याचे कायदामंत्री रविशंकर प्रसाद देखील दिसत आहेत.
Comments
Loading…