मुंबईच्या अॅन्टी नार्कोटिक्स सेलने ओडिशातून मुंबईत काम करणारं गांजाचं रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. या रॅकेटमार्फत मुंबईत दर महिन्याला 4 टन गांजा पुरवला जात होता. या प्रकरणी आता दोघांना अटक करण्यात आली आहे. मात्र मुंबईतील मुख्य आरोपी फरार अद्याप फरार आहे.
मुंबई क्राइम ब्रांचच्या अॅन्टी नार्कोटिक्स सेलने केलेल्या कारवाईने गांजा तस्करांचे धाबे दणाणले आहेत. या पथकाने शुक्रवारी विक्रोळीत तब्बल 1 हजार 800 किलो गांजा जप्त केला आहे. या गांजाची किंमत अंदाजे तीन कोटी ६० लाख रुपये आहे. या प्रकरणी यादव आणि सोनवणे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
रॅकेटचा पर्दाफाश
ओडिशातील लक्ष्मी प्रधान या रॅकेटचा मुख्य सुत्रधार असून त्याच्या मार्फत दर महिन्याला महाराष्ट्रात 5 टन गांजा येत होता. यातील 4 टन गांजा एकट्या मुंबईत सप्लाय होत होता. पुणे आणि सोलापूरमध्येही गांजाचा पुरवठा होत होता. विशेष म्हणजे या तस्करीदरम्यान प्रवासात ड्रायव्हर बदलले जायचे. त्यामुळे माल कोणाला द्यायचा, याची ड्रायव्हरलाही माहिती नसायची. मुंबईत संदीप सातपुते हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार आहे. आता पोलीस त्याच्या शोधात आहेत.
पाच ते सहा वर्षांपासून ओडिशा ते मुंबई अशी गांजाची तस्करी सुरू आहे. विशेष म्हणजे चार महिन्यांत अॅन्टी नार्कोटिक्स सेलने 32 प्रकरणात 15 कोटींचे अंमली पदार्थ हस्तगत केल्याची माहिती सह पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी दिली. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा अन्य 32 प्रकरणांशी काही संबंध आहे का, याची चौकशी सुरू आहे.
Comments
Loading…