राज्यात कोरोनाचा फैलाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना करण्यास शासनाने सुरुवात केली आहे. काही ठिकाणी संचारबंदी लागू केली असून कोरोनाविषयक नियमांची काटेकोरपणे अंमबजावणी देखील सुरू केली आहे. आता मंत्रालयातील उपस्थिती देखील मर्यादित केली आहे.
राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. अधिकारी महासंघाने पुढाकार घेऊन तसेच सर्वाना विश्वासात घेऊन दोन शिफ्ट्समध्ये मंत्रालयातील कार्यालयीन वेळांचे नियोजन कसे करता येईल ते पाहावे. तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येईल, याबाबत तात्काळ नियोजन करा, अशी सूचना ठाकरे यांनी मुख्य सचिवांना केली.
त्यापाठोपाठ आता मंत्रालयात 50 टक्के उपस्थिती ठेवण्याबाबतचे परिपत्रक राज्य शासनाने जारी केले आहे. त्यात तीन पर्याय सुचविले आहेत. त्यानुसार कर्मचाऱ्यांना एक दिवसाआड मंत्रालयात बोलावता येईल किंवा आठवड्यातून तीन दिवस 50 टक्के कर्मचारी, तर पुढील तीन दिवस उर्वरित कर्मचारी बोलावणे, असा दुसरा पर्याय देण्यात आला आहे. याशिवाय, एक आठवडा 50 टक्के तर उर्वरित कर्मचारी पुढील आठवडाभर काम करतील, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
Comments
Loading…