भारतात कोरोना विषाणूमध्ये बदल होत असून, या विषाणूचा एक नवा प्रकार आढळल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. या नव्या प्रकारात डबल म्युटंट म्हणजे दुहेरी उत्परिवर्तन झाले असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या या उद्रेकामागे हा नवा स्ट्रेन आहे का याचा शोध घेतला जात आहे. विषाणूचा हा नवा प्रकार नेमका किती धोकादायक आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही.
म्युटेशन म्हणजे विषाणूच्या गुणसुत्रांच्या संरचनेत बदल होणे, एका विषाणूमध्ये दोन म्युटेशन होण्याच्या प्रक्रियेला ‘डबल म्युटेशन’ म्हणतात. लाखो लोकांच्या शरीरातून विषाणू पसरत असताना असे बदल घडतात. बदल झालेल्या विषाणूंना नवीन ‘स्ट्रेन्स’ किंवा ‘व्हेरियंट्स’ म्हणतात. भारतात कोरोनाच्या एकाच प्रकारच्या विषाणू रचनेत दोन बदल आढळून आले आहेत. एखाद्या व्हेरियंटसमोर एखादी लस कमी-जास्त प्रमाणात प्रभावी ठरू शकते.
कोरोना विषाणूचे बदललेले रूप नेमके कसे आहे, हे समजून घेण्यासाठी जगभरातील प्रयोगशाळांत शास्त्रोक्त अभ्यास सुरू आहे. मात्र, याचा किती गंभीर परिणाम होईल किंवा होणार नाही या निर्णयापर्यंत अजूनतरी शास्त्रज्ञ पोहोचलेले नाहीत. कोरोना विषाणूमध्ये झालेल्या म्युटेशनमुळे लसींच्या परिणामकारकतेवरही प्रश्न निर्माण होत आहेत. सर्व लस कंपन्यांनी आपल्या लसी कोरोनाच्या स्पाईक्सविरोधात लढण्यासाठी सक्षम बनवण्यात आल्याचे सांगत आहेत. मात्र, विषाणू अशा पद्धतीने बदलत गेला तर, कोरोना लसींमध्येही आवश्क बदल करणं गरजेचं असल्याचं काही शास्त्रज्ञ सांगत आहेत.
या नव्या कोरोना संसर्गाचा थेट परिणाम घसा, फुफ्फुस आणि मेंदूवर होत आहे. रुग्णांमध्ये उलट्या, अस्वस्थता, पोटदुखी आणि अतिसार यासारखी लक्षणे दिसत आहेत. यासोबत, आधीच्या कोरोनासारख्या वास न येणं, अन्नाची चव न कळणे अशी लक्षणे नवीन कोरोना स्ट्रेनच्या रुग्णांमध्येही आढळत आहेत.
Comments
Loading…