लोकशाही न्यूज नेटवर्क
टोल भरल्यानंतरही पुणे सातारा रस्त्याचे का पूर्ण होत नसल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर टीका होत असते. या प्रकरणावर आता केंद्रीय रस्ते विकास आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पुणे सातारा रस्त्याचे काम रखडण्यामागे अॅक्सिस बँकेचा हात असल्याचा दावा गडकरींनी केलाय. टोलच्या माध्यमातून जमा होणारे पैसे अॅक्सिस बँकेने स्वत:च्या खात्यावर जमा केल्याने ठेकेदारांचे पैसे थकले आहेत. यामुळे कामाची गती मंदावल्याचा आरोप नितीन गडकरी यांनी केला आहे.
पुणे-सातारा महामार्गावर चार ठिकाणी पुलांचे काम अर्धवट होते. त्यातील एकाचे आत्ताच पूर्ण झाले. उर्वरित काम मार्च महिन्यात पूर्ण होईल. या कामाला अॅक्सिस बँक वित्तपुरवठा करते. टोलचे पैसे बँकेच्या खात्यात जमा होतात. मात्र, त्यातील पैसे ठेकेदारांना मिळत नसल्याने पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले. मात्र, कंत्राटदारांना पैसे देण्यासाठी बँकेकडे पैसेच नव्हते. अखेर ‘एनएचएआय’लाच नागरिकांची अडचण दूर करण्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागले, असे गडकरी म्हणाले.
अमृता फडणवीस अॅक्सिस बँकेच्या कार्यकारी मंडळावर?
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर काही मंत्रालयांची बँक खाती अॅक्सिक बँकेला देण्यात आली होती. या खात्यांचे आर्थिक व्यवहार अॅक्सिस बँकेमार्फत होत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अॅक्सिस बँकेच्या कार्यकारी मंडळावर होत्या. त्यांच्याकडे अॅक्सिस बँकेच्या कॉर्पोरेट वेस्ट झोनचा व्हाइस प्रेसिडेंटचा पदभार होता. यामुळे देवेंद्र फडणवीस यांना सरकारी खाती वळवताना टीकेचा सामना करावा लागला होता. आज गडकरी यांनी देखील ठेकेदारांचे पैसे थकवल्याप्रकरणी अॅक्सिस बँकेला लक्ष्य केले आहे. त्यामुळे अॅक्सिस बँक पुन्हा चर्चेत आली आहे.
Comments
Loading…