लोकशाही न्यूज नेटवर्क
निवृत्त न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांचे वयाच्या ९१व्या वर्षी निधन झालं आहे. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी बाणेरमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. पुण्यातील पहिली एल्गार परिषद पी.बी.सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती.
पी.बी.सावंत हे १९८९ ते १९९५ या काळात सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती होते. त्यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (एलएलबी) घेतली. त्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्ट, सुप्रीम हायकोर्टात न्यायाधीश म्हणून काम पाहिलं. १९९५ मध्ये ते निवृत्त झाले. सेवानिवृत्तनंतरही सामाजिक कार्यक्रमांमध्ये ते सक्रीय होते. त्यांनी वर्ल्ड प्रेस कऊन्सिल आणि प्रेस कऊन्सिल ऑफ़ इंडियाचे अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिलं होतं. तसंच यादरम्यान लोकशासन आंदोलन पार्टीचे संस्थापक म्हणून मोठ्या प्रमाणावर त्यांनी काम केलं होतं.
पी. बी. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील पहिली एल्गार परिषद पार पडली होती. तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी नेमण्यात आलेल्या समन्वय समितीचेदेखील ते सुरुवातीच्या काळात अध्यक्ष होते. गोध्रा दंगलीप्रकरणी स्थापित तीन सदस्यीय ट्रिब्युनलचे देखील ते सदस्य होते. त्याचा प्रमाणे बिनखर्चाची निवडणूक व्हावी असं परखड मत देखील त्यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केलं होतं.
पी. बी. सावंत यांच्या जाण्याने राजकीय स्थरातून दु:ख व्यक्त होत आहे. पी. बी. सावंत यांच्या निधनामुळे देश एका महान विधिज्ञास मुकला अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
Comments
Loading…