पालघर जिल्ह्यात दोन साधूसह तिघांच्या झालेल्या हत्ये प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपपत्रे न्यायालयात दाखल केली आहेत. त्यातील दुसरे आऱोपपत्र सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत. देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आलेला असताना हे हत्याकांड घडले होते.
पालघर येथील गडचिंचले गावात जमावानं दरोडेखोर समजून दोन साधूंसह त्यांच्या ड्रायव्हरची लाठ्याकाठ्या व दगडानं ठेचून हत्या केली होती. या हत्येचे पडसाद देशभरात उमटले होते. राज्य सरकारनं गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास सोपवला होता. या हत्याकांड प्रकरणी गुन्हे शाखेनं 12 हजार पानांची दोन वेगवेगळी आरोपपत्र दाखल केली. यात 250हून अधिक जणांना आरोपी करण्यात आले आहे. साधूंची हत्या हा कुठल्याही कटाचा भाग नाही. तसेच या घटनेचा कुठल्याही धर्माशी संबंध नाही. केवळ अफवेतून हा प्रकार घडल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यावरील सुनावणी आता दोन आठवड्यांनी होणार आहे.
Comments
Loading…