माघी एकादशी निमित्त 23 फेब्रुवारीला पंढरपूरमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून शहर व आसपासच्या 10 गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संचारबंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे माघी एकादशीच्या दिवशी भाविकांना पंढरपूरमध्ये प्रवेश बंदी असणार आहे. मात्र, यादरम्यान एसटी सेवा सुरळीत राहणार आहे.
एकादशीला भाविकांना प्रवेशबंदी
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा माघी एकादशी सोहळा 22 ते 23 फेब्रुवारी दरम्यान पंढरपूर येथे पार पडणार आहे. या दिवशी पंढरपुरातील गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून एक दिवसाची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंढरपूर शहरासह शेगाव दुमाळे, लक्ष्मी टाकळी, वाखरी, गोपाळपूर, गादेगाव, कोर्टी, शिरढोण, कौठाळी, चिंचोली भोसे या गावांमध्ये संचारबंदी असणार आहे. या काळात पंढरपूरमध्ये भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच धर्मशाळा, मठ, लॉज या ठिकाणी व्यक्तींना राहण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, या काळात आपत्कालीन व्यवस्था सुरू राहणार आहे.
विठ्ठल मंदिरातील दर्शन दोन दिवस बंद
विठ्ठल मंदिर समितीने माघी एकादशी व द्वादशी या दिवशी विठ्ठल मंदिर मुखदर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 22 व 23 फेब्रुवारीला विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन बंद राहिल. 24 फेब्रुवारीला मुखदर्शन सुरळीत करण्यात येणार आहे. संचारबंदीच्या काळात विठ्ठलाची नित्यपूजा सुरूच राहणार आहे.
Comments
Loading…