लोकशाही न्यूज नेटवर्क
जागतिक कमॉडिटी बाजारात तेलाच्या वाढलेल्या किमती आणि लंडन क्रूड ऑइल एक्सचेंजमध्ये कच्च्या तेलाचा भाव वाढल्याने भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलने लीटरमागे ९४ रुपयांचा टप्पा ओलांडला असून, दिल्लीत पेट्रोलचा दर ८७.६० रुपये प्रति लिटर झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ दिसून येत असल्यामुळे तेल कंपन्यांनी दरवाढीचा निर्णय घेतला. ब्रेंट क्रूड ऑइनचा दर प्रति बॅरल ६१ डॉलरवर गेला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झालेल्या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर लीटरमागे ९४.१२ रुपये आणि डिझेलचा दर लीटरमागे ८४.६३ रुपये झाला. मुंबईत पेट्रोलच्या दराने नवा उच्चांक गाठल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीत पेट्रोल ९० रुपयांच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज दिल्लीत एक लिटर पेट्रोल ८७.६० रुपये आहे. डिझेलचा भाव ७७.७३ रुपये आहे.
इंधनदरात होणारी वाढ पाहता मुंबईत लवकरच पेट्रोल शंभरी गाठेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. देशभरातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर नव्वदीजवळ पोहोचले आहेत. सरकारकडून पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा मिळताना दिसत नाही. याउलट, अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलवर शेती कर लावण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
Comments
Loading…