लोकशाही न्यूज नेटवर्क – संदीप गायकवाड | लॉकडाऊनमध्ये आईच्या निधनाने पोरक्या झालेल्या 8 महिन्याच्या चिमुरडीची 2 लाखात विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीचा विरारमध्ये भांडाफोड झाला आहे. याप्रकरणात 4 आरोपीना विरार पोलिसांनी बेड्या ठोकून चिमुरडीची सुखरूप सुटका केली आहे.
विक्रीसाठी आणलेल्या 8 महिन्याच्या चिमुरडीची आईचे लॉकडाऊनमध्ये निधन झाले होते. मुलीच्या जन्मा अगोदरच वडील आईला सोडून गेले होते. आईच्या निधनानंतर चिमुरडी एका नातेवाईकांकडे राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे. या सर्व घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
याबाबत विरार पोलीस ठाण्यात भादवी 370 (1) 34 सह बाल न्याय अधिनियम सन 2015 कलम 79, 81 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आज वसई न्यायालयाने 4 ही आरोपीना 16 फेबुरवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विरार पश्चिम बस स्थानक परिसरात 8 महिन्याच्या मुलीची विक्री करण्यासाठी एक टोळी येणार असल्याची माहिती विरार पोलिसांना मिळाली होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीम ने सोमवारी रात्रीच्या सुमारास सापळा लावला होता. लहान मुलीसह 4 जण संशयित दिसताच त्यांना ताब्यात घेऊन, चौकशी केली असता सदर धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
पोलिसांनी तात्काळ 8 महिन्याच्या चिमुरडीची सुखरूप सुटका करून, तिला प्रथम विरार पश्चिमेच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून, पुढील उपचार व संगोपन साठी मुंबई अंधेरी येथील एका बालसंगोपन केंद्रात पाठविण्यात आले आहे. विरार पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका चिमुरडीची सुखरूप सुटका झाली आहे. आता या टोळीने आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास ही पोलीस करत आहेत.
Comments
Loading…