in ,

वर्धापन दिन विशेष : ‘असा’ होता शिवसेनेचा राजकीय प्रवास

श्रीकांत घुले

महाविकास आघाडी सरकारची स्थापना आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यानंतर शिवसेनेचा हा दुसरा वर्धापन दिन आहे, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन आहे. दोन वर्षात राम मंदिर, हिंदुत्वाचा मुद्दा, कोरोना, मराठा आरक्षण, सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण, पोलीस निरीक्षक सचिन वाझे खंडणी प्रकरण, विरोधकांकडून सतत सुरू असलेले भ्रष्टाचाराचे आरोप यांसारख्या विविध खाचखळग्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जावे लागले. एका आक्रमक पक्षाचा पक्षप्रमुख असतानाही तोल जाऊ न देता, ते सक्षमपणे मुख्यमंत्री पद भूषवत आहेत. तेही कोणताही प्रशासकीय सेवेचा अनुभव नसताना. आज शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने ‘लोकशाही न्यूज’ने घेतलेला हा आढावा.

शिवसेनेची स्थापना –

शिवसेनेच्या जन्माची बीजं मार्मिक साप्ताहिकाच्या माध्यमातून रुजली. १९ जून १९६६ रोजी शिवसेना पक्षाची स्थापना झाली. मराठी लोकांनी या ‘संघटना’ म्हणून उदयाला आलेल्या संस्थेचे सदस्यत्व मिळावे यासाठी धडपड सुरू केली. सुरुवातीच्या काळात राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. आज ५५ वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. शिवसेनेचा वर्धापन दिन म्हटला तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक सेनेची जन्मभूमी असलेल्या मुंबईत रीघ लावतात. गेल्या पाच दशकांचा हा इतिहास आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही साधेपणाने वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे.

शिवसेनेचा राजकारणात प्रवेश –

१९६७ साली शिवसेनेने ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. तसेच लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्रचारही केला. त्याच्या पुढच्याच वर्षी प्रजा समाजवादी पक्षाबरोबर निवडणूक लढवून मुंबई महानगरपालिकेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेच्या शाखा सर्वत्र दिसू लागल्या. शिवसेना शाखांकडे आपले प्रश्न सोडवण्याचे एक व्यासपीठ म्हणून लोक पाहू लागले.

शिवसेनेचा पहिला आमदार –

कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई यांची ५ जून १९७० मध्ये हत्या झाली. त्यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेचे वामनराव महाडिक विजयी झाले. महाडीक हे शिवसेनेचे पहिले आमदार होते.

पहिला महापौर –

शिवसेनेने १९६८ मध्ये राजकारणात प्रवेश केला असला तरी सेनेचे पहिले महापौर खुर्चीत बसायला १९७१ साल उजाडले. दादरचे डॉ. हेमचंद्र गुप्ते शिवसेनेचे पहिले महापौर झाले. १९७२ साली प्रमोद नवलकर विधानसभेत गेले, तर त्याच्या पुढच्या वर्षी सतीश प्रधान ठाण्याचे महापौर झाले. शिवसेनेने १९७५ साली आणीबाणीला पाठिंबा जाहीर केला. शिवसेनेच्या गुप्ते यांच्यानंतर अनेक महापौर मुंबईत झाले. काही महापौरांना काँग्रेसचा तर काही महापौरांना भाजपाचा पाठिंबा मिळाला. सध्या १९९५पासून शिवसेनेचे महापौर मुंबईत आहेत.

शिवसेना-भाजप युती –

स्थापनेपासूनच शिवसेना आक्रमक संघटना राहिली आहे. परंतु, सुरुवातीच्या काळात काँग्रेसशी अनेक निवडणुकांत मैत्री ठेवली होती. १९८० साली काँग्रेसला मदत केल्याबद्दल शिवसेनेला विधान परिषदेवर दोन जागा देण्यात आल्या. १९८४ साली शिवसेनेने भाजपबरोबर युती केली. परंतु भाजप पुलोदमध्ये सहभागी झाल्यानंतर ही युती तुटली. त्यानंतर पुन्हा १९९८ मध्ये शिवसेना-भाजप युती झाली. बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही युती झाली. शिवसेनेने त्यापूर्वीही अनेक पक्षांशी युती केली होती. काँग्रेस, समाजवादी पक्षासह अगदी कट्टर विरोधक असलेल्या दलित पँथरसोबतही शिवसेना युतीत राहिली. त्यानंतर १९८९ साली भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये पुन्हा युती झाली. ती २५ वर्षे टिकली. २०१४ मध्ये भाजप आणि शिवसेनेने विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या लढल्या. त्यानंतर ते पुन्हा एकत्र आले. २०१९ मध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती निवडणुकीनंतर पुन्हा तुटली.

शिवसेनेचा मुख्यमंत्री –

युतीचा फायदा शिवसेना-भाजप अशा दोन्ही पक्षांना झाला. १९९५ मध्ये शिवसेना भाजप युती सरकार महाराष्ट्रात सत्तेत आले. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. पुढे हेच मनोहर जोशी १९९९ मध्ये सत्तेत आलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित एनडीए सरकारमध्ये लोकसभा अध्यक्ष होते. महाराष्ट्रात तळागाळात वाढण्यासाठी, हातपाय पसरण्याठी या दोन्ही पक्षांना फायदा झाला. मनोहर जोशी यांच्यानंतर अल्पकाळासाठी नारायण राणे मुख्यमंत्री झाले. तर २०१४ साली भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेने पाठिंबा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस या युतीचे तिसरे मुख्यमंत्री झाले. मात्र २०१९ साली शिवसेना आणि भाजपा युती तुटल्यामुळे उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडीचे आणि विशेष म्हणजे ठाकरे घराण्यातील पहिले मुख्यमंत्री झाले. आज ठाकरे घराण्यातील दोन नेते विधिमंडळात आहेत. आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडून आले ते राज्याचे पर्यटनमंत्री आहेत.

What do you think?

Written by user

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Coronavirus : देशात नव्या ६०,७५३ बाधितांची भर

सातारकरांचा पाणी प्रश्न मिटला