लोकशाही न्यूज नेटवर्क
पुण्यातील पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. यामध्ये जे दोषी असतील त्यांना शिक्षा केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (13 फेब्रुवारी) दिली. ‘लोकशाही न्यूज’ने सर्वात आधी या प्रकरणाला वाचा फोडली होती. या प्रकरणातील ऑडिओ क्लिप देखील नागरिकांसमोर आणल्या होत्या, हे उल्लेखनीय!
पुण्यातील मंमदवाडी हडपसर येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय युवतीने उडी मारून आत्महत्या केली होती. याबाबतचे वृत्त सर्वात आधी ‘लोकशाही न्यूज’ने दिले होते. या मृत्यूची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य सरकारमधील एका मंत्र्याचे नाव समोर आल्याची चर्चा आहे. या प्रकरणी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याशिवाय, भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचे नाव घेतले आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज ट्रान्सहार्बर कामाची पाहणी केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ट्रान्स हार्बर प्रकल्पाची माहिती देत असता पत्रकारांनी त्यांच्याकडे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाबाबत विचारणा केली. त्यावर त्यांनी लागलीच भाष्य केले नाही. पण नंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी केली जाणार आहे. यामध्ये जे दोषी असतील त्यांना शिक्षा केली जाईल. या प्रकरणात कोणी दोषी वाचू नये, हे पाहतानाच कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, याची काळजी घेण्याची गरज आहे. ज्यांच्यावर कारवाईची गरज असेल, त्यांच्यावर कारवाई होईल, असे उद्ध्व ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या ग्वाहीमुळे या लढ्यातील पहिल्या टप्प्याला यश आले आहे. पूजाला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे.
Comments
Loading…