भाजपच्या बुलेट ट्रेनच्या संकल्पनेला विरोध दर्शवणाऱ्या ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन यांनी औपचारिकरित्या भाजपात प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. मल्लपुरम येथील एका कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा पार पडला.
भाजपाचे के. सुरेंद्रन यांनी २१ फेब्रुवारी रोजी ई. श्रीधरन यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती दिली होती. अखेर आज ई. श्रीधरन यांनी औपचारिकरित्या भाजपामध्ये प्रवेश केला.
बुलेट ट्रेन बाबत काय म्हणाले ?
२०१८ साली मेट्रो मॅन इ श्रीधरन यांनी सरकारचे कान टोचले होते. बुलेट ट्रेन खूपच खर्चिक सेवा आहे. सद्यस्थितीत भारताची गरज वेगळी आहे. भारतीय रेल्वेची स्वच्छता, दर्जा, वेग आणि सुरक्षा यामध्ये वेगाने चांगले बदल होणे अपेक्षित आहे असेही त्यांनी म्हटले होते.
कोण आहेत ?
२००२ रोजी दिल्ली मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली तेव्हा मेट्रोची धुरा ई. श्रीधरन यांच्याकडे होती. त्याचप्रमाणे ई. श्रीधरन यांनी कोकण रेल्वेच्या बांधकामासाठीही मोलाचं मार्गदर्शन केलं होतं. ई. श्रीधरन हे ८८ वर्षांचे असून त्यांचा जन्म मद्रास संस्थानामध्ये १९३२ साली करुकापुथूर येथे झाला होता. श्रीधरन यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळालेले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी केलेल्या कामानिमित्त त्यांचा जगभरामध्ये नावलौकिक आहे. २००१ साली त्यांना पद्मश्री तर २००८ साली पद्म विभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. २००५ साली फ्रान्स सरकारने त्यांना विशेष पुरस्कार जाहीर केला होता. तर २००३ साली टाइम मॅगझिनने त्यांचा उल्लेख आशियाज हिरो या नामावंत व्यक्तींच्या यादीमध्ये केला होता.
Comments
Loading…