कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे चित्र असतानाच या विषाणूचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहे. याच कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनािषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तर, दुसरीकडे नागरिकांचे मात्र ‘हम नहीं सुधरेंगे’ हीच मनोवृत्ती दिसते. याच मनोवृत्तीमुळे लोकशाही न्यूजच्या रिपोर्टरला ठाण्यात धक्काबुक्की करण्यात आली. पोलिसांनी धक्काबुक्की करणाऱ्याला रात्री अटक केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (रविवारी) ‘मी जबाबदार’ या उपक्रमाची घोषणा केली. याअंतर्गत, प्रत्येकाने सांगायचं आहे की, मीच जबाबदार आहे. याचा अर्थ असा आहे की, मी घराबाहेर पडताना मास्क वापरेनच, वेळोवेळी हात धुणार व सोशल डिस्टन्सिंग ठेवणार, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
तर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही कोरोना झालेला आहे. त्यांनी रुग्णालयातून महाराष्ट्रातील जनतेसाठी एक पत्र लिहिले आहे. त्यात ते म्हणतात – ‘आपणास माझे कळकळीचे आवाहन राहिल की, मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर, हे तंतोतंत पाळा व लॉकडाऊन टाळा.’
तर, दुसरीकडे अनेकजण याबाबत अतिशय बेफिकिरी दाखवत आहेत. ठाण्यात असाच बेजबाबदारपणा पाहायला मिळाला. लॉकडाऊनची भीती जनतेच्या मनात आहे का? याची रिअॅलिटी चेक करण्यासाठी ठाणे बाजारपेठेतून लोकशाही न्यूजचे प्रतिनिधी निकेश शार्दुल यांनी आढावा घेतला. तिथे अनेक नागरिक आणि व्यापारी विनामास्क आढळले. जे.डी वनगे या मसाल्याच्या व्यापाऱ्याला मास्क का घातला नाही, अशी विचारणा केली असता त्याने निकेश शार्दुल यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि माईक खेचून घेतला.
ही बातमी लोकशाही न्यूजवर झळकताच पोलिसांनी या दुकानदाराला अटक केली आहे. कुणाल शिनलकरवर असे या दुकानदाराचे नाव असून साथ प्रतिबंधक कायद्यान्वये त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
Comments
Loading…