in

‘अनिल देशमुख अपघाती गृहमंत्री; उठसूट कॅमेऱ्यासमोर बोलणं योग्य नाही’

भाजपाकडून झालेल्या आरोपांवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. त्याचबरोबर वाझे प्रकरणावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही सवाल केला आहे. राऊत यांनी सामनामधून अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला ठाकरे यांचे सरकार पाडण्याची घाई झाली आहे. त्यामुळे फाटक्या फुग्यात हवा भरण्याचे काम ते करीत आहेत. त्यांचे आरोप सुरुवातीला जोरदार वाटतात. नंतर ते खोटे ठरतात. पण अशा आरोपांमुळे सरकारे पडू लागली तर केंद्रातल्या मोदी सरकारला सगळ्यात आधी जावे लागेल, असं राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात काय घडले? मनसुख हिरेन व अँटिलिया स्फोटकं प्रकरणात राज्य सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली केली. होमगार्ड महासंचालक पदावरील बदली ते सहन करू शकले नाहीत. त्यांच्या अस्वस्थतेत तेल ओतले ते गृहमंत्री देशमुखांनी. पोलीस आयुक्तांनी चुका केल्या, त्यामुळे त्यांना जावे लागले असे एक विधान देशमुखांनी करताच परमबीर सिंह यांनी १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट गृहमंत्र्यांनी कसं दिलं होतं, अशा पत्राचा स्फोट केला. पुन्हा हे टार्गेट कुणाला दिले, तर मनसुख हिरेन या तरुणाच्या हत्येचा आरोप ज्यांच्यावर आहे त्या सचिन वाझेंना. सचिन वाझे हे आता रहस्यमय प्रकरण झाले. पोलीस आयुक्त, गृहमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख लोक यांचा लाडका व भरवशाचा असा हा वाझे फक्त साधा सहाय्यक पोलीस निरीक्षक होता. त्याला मुंबई पोलिसांचे अमर्याद अधिकार कोणाच्या आदेशाने दिले हा खऱ्या चौकशीचा विषय आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयात बसून वाझे वसुली करीत होता, तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नसावी?, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

गृहमंत्री देशमुखांवर हल्लाबोल –

‘देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो. अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसे चालेल?,” असा टोला राऊत यांनी गृहमंत्री देशमुख यांना लगावला आहे.

What do you think?

-13 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मनिषा उईके कोण; दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात नवा टि्वस्ट

बच्चू कडू विलगीकरणात; यापूर्वी दोनवेळा कोरोना पॉझिटिव्ह