लोकशाही न्यूज नेटवर्क
कणकवलीत लाइफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी नारायण राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना बोलावले. देवेंद्र फडणवीसांसह पक्षातील बड्या नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. गृहमंत्र्यांनी राणेंवर स्तुतीसुमनेही उधळली. मात्र त्यांची पाठ फिरताच आता वैभववाडीत भाजपाला धक्का बसला आहे. सात नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजपा तालुकाध्यक्षांकडे हे राजीनामे सोपवण्यात आले आहेत. वैभववाडी नगरपंचायतीची निवडणूक तोंडावर असतानाच राजकीय भूकंप झाल्याने भाजपाला धक्का बसलाय.
हे सातही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यांमध्ये चार माजी नगराध्यक्ष देखील आहेत. वैभववाडी नगरपंचायतीत भाजपाची एकहाती सत्ता आहे. मात्र, पक्षांतर्गत गटबाजीतून राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
“अमित शाहांचा पायगुण?”
कणकवलीतील कार्यक्रमाआधी भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी अमित शाहांच्या आगमनाची जोरदार तयारी केली होती. या उद्घाटन सोहळ्याला राज्यातील भाजपाचे मातब्बर नेते उपस्थित होते. शाह येण्याआधी नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलताना, ‘अमित शाहांच्या पायगुणाने राज्यातील महाविकास आघाडी सरकार जावो’, अशी इच्छा बोलून दाखवली. मात्र गृहमंत्र्यांची पाठ फिरताच राणेंच्या बालेकिल्ल्यात राजकीय भूकंप झाला. यामुळे आता ‘पायगुणाची’ चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Comments
Loading…