एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना दुसरीकडे देशात लसीकरण मोहीमही जोरदार सुरू करण्यात आली. पण आता कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. अशातच कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही मुंबई आणि नागपूरमध्ये सात आरोग्यसेवकांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव झाला आहे. मेडिकल आणि डेंटल रुग्णालयातील मिळून 38 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी पाच डॉक्टरांना पहिल्या टप्यातील कोरोना प्रतिबंधक लस दिली होती. त्यांच्याव्यतिरिक्त निवासी डॉक्टरसहित इतर संक्रमित झाल्याची माहिती आहे.
मेडिकलमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मेडिकल प्रशासनाने संपूर्ण हॉस्टेलचे निर्जुंतुकीकरण करण्यात आले आहे. पण पुन्हा एकदा नागपूरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. डॉक्टरच पॉझिटिव्ह होत असल्याने भविष्यात आरोग्य यंत्रणेवर ताण वाढण्याची शक्यता आहे.
तर, दुसरीकडे मुंबईतील नायर रुग्णालयात एक डॉक्टर आणि एका नर्सला कोरोना झाला आहे. लस घेतल्यानंतरही मास्क आणि सुरक्षित अंतराचे पालन करणे आवश्यक आहे. पण, हे केले जात नसल्याने लसीकरणानंतरही कोरोनाची लागण होत आहे. म्हणूनच नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.
Comments
Loading…